शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे द्यावेत — वैशाली खैरनार

संगमनेर पंचायत समितीचा उपक्रम

प्रतिनिधी —

कोविड कालावधीनंतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती व त्यातून कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो, म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे गांभीर्य समजून सांगतानाच त्यांना हे धडे देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार यांनी केले.

संगमनेर पंचायत समितीतर्फे गणेश उत्सवानिमित्त गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या पुढाकाराने गणेश उत्सवानिमित्त आयोजित ‘विद्यार्थी व महिलांसाठी सायबर सुरक्षा’ या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अनिल नागणे तर अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड हे होते.

या कार्यशाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, झूम लिंक तयार करणे, भ्रमणध्वनी व संगणकाचा  अध्यापनासाठी प्रभावी वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागामार्फत याप्रसंगी पोषण आहार प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अशोक देशमुख यांचे ताणतणावाचे व्यवस्थापन, पारंपारिक मैदानी खेळाचे आयोजन असे  विविध उपक्रमही या सप्ताहहात आयोजित करण्यात आले.

खैरनार म्हणाल्या की, विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी आणि महिलांसाठीही सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या काळात भ्रमणध्वनी आवश्यक झाला आहे. महिलांनी आपला भ्रमणध्वनी दुसऱ्याच्या हातात देताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे पांढरपेशे तंत्रस्नेही गुन्हेगार आपल्या अवतीभवती असू शकतात याची जाणीव ठेवली पाहिजे.

आंधळा विश्वास कुणावरही ठेवू नये. सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे,  कारण ती केवळ माहितीच नाही तर आपल्या प्रणालीला व्हायरसच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायला मदत करते. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, इंटरनेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी बनावट ई-मेल संदेश वापरणे वैयक्तिक माहितीचा गैरवापर करणे हॅकिंग वेबसाईट किंवा संगणक नेटवर्क बंद करणे किंवा त्याचा गैरवापर करणे, द्वेष पसरवणे आणि दहशतवादाला उत्तेजन देणे,  बाल पोर्नोग्राफी वितरण करणे, अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ अशा गोष्टी सायबर क्राईम मध्ये येतात असेही त्यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी अनिल नागणे याप्रसंगी म्हणाले की, शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात केला तर शिक्षण प्रक्रिया आनंददायी व प्रभावी होऊ शकेल . त्याचबरोबर महिला शिक्षिकांसाठी स्वतःची सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली कडलग यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली रेपाळ तर आभार प्रदर्शन अंजली मुळे यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!