समन्यायी पाणी वाटप कायद्याला संगमनेरनेच प्रथम विरोध केला — आमदार बाळासाहेब थोरात
थोरात कारखाना ऊसाला २८३५ रुपये भाव देणार
प्रतिनिधी —
२०१४ मध्ये राष्ट्रपती राजवट असताना समन्यायी पाणी वाटप कायदा लागू झाला. मात्र या कायद्यातील त्रुटींबाबत आपण सातत्याने आवाज उठवला. या कायद्याच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील जनता एकत्र येऊन तालुका बंद ठेवून तीव्र आंदोलने केली. मोर्चे काढले, संघर्ष केला. या कायद्याविरोधात आपली न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. मात्र संघर्षाच्या वेळेस अनेक पुढारी गप्प बसून होते अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे व्हा.चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह संचालक मंडळ आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

निळवंडे धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला 2014 ते 19 कालव्यांची कामे थंडावली होती. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येतात रात्रंदिवस कामाला गती दिली. कोरोना काळातही या कामाचा पाठपुरावा केला. आपले सरकार असते तर डाव्या कालव्यातून दोनदा आणि उजव्या कालातून एकदा पाणी दिले असते. पाणी तालुक्यात आले आपण मोठा आनंदोत्सव साजरा केला. मात्र हा आनंद काहींना पहावत नसल्याने तातडीने पाणी बंद केले. यावर्षी अत्यंत कमी पाऊस आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. भोजापुर धरण भरत आहे तर राजकीय फोनाफोनी सुरू आहे यामुळे पाणी वाया जाण्याची भीती आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नैतिकतेच्या पायावर येथील सहकार उभा केला आहे. सर्व सहकारी संस्थांचा आलेख चढता क्रमाने आहे. कारखान्याने अत्यंत अडचणीतून चांगले काम करताना यावर्षी 10 लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. आगामी काळात कार्यक्षेत्रात ऊस वाढवण्याबरोबर एकरी शंभर टन उत्पादन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन 2835/- रुपये भाव दिला जाणार असल्याचे आमदार थोरात यांनी जाहीर केले आहे.

गणेश कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून अडथळे उभे केले जात आहेत.
सत्ता बदल होताच काहींनी अडचणी उभ्या केल्या. तालुक्यातील विकास कामांना स्थगिती दिली आहे. दहशत निर्माण करून विकास कामे रोखले जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. पण यामुळे विकास थांबणार नाही. असा इशारा देताना गणेश कारखाना आठ वर्षे त्यांना चालवता आला नाही. तो कारखाना चांगला असून त्या क्षेत्रात ऊस उत्पादन चांगले आहे. तेथील सभासद, कामगार यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. ते सर्व आपल्या पाठीशी भक्कम असून या कारखान्याच्या कर्जाला काही लोक अडथळे निर्माण करत आहे. मात्र अडचणींवर मात करून तो कारखाना चांगला चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

