गणेश चा लढा शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी !

आज गणेश कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

आमदार बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे राहणार उपस्थित

ज्येष्ठ नेते शिवाजीराव लहारे यांची भूमिका

प्रतिनिधी —

स्वाभिमानी गणेश परिसरासाठी होऊ घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी व्यक्त केला. सोबतच प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (मंगळवार दि. २६ सप्टेंबर) रोजी दुपारी एक वाजता ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली.

श्री गणेश हा निव्वळ कारखाना नसून राहाता तालुक्याच्या विकासाची कामधेनु आहे. कारखान्यावर हजारो कुटुंबांचे प्रपंच अवलंबून आहेत. तसेच या परिसरातील विकासालाही कारखान्यामुळे गती मिळणार आहे. गणेश कारखान्यावर बहात्तर कोटीचा दावा ठोकून प्रवरा सहकारी साखर कारखान्याने गणेश समोर संकटांची मालिका उभी केली आहे. कारखाना बंद ठेवून या परिसरातला ऊस हडप करण्याचा डाव प्रवरा कारखान्याच्या नेतृत्वाचा दिसतो. हा कारखाना कामगार, सभासद आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. तो सुरू करण्यासाठी आम्ही कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्याची तयारी ठेवलेली आहे.

कारखान्याच्या निवडणुकीनंतर आम्ही राजकारण करायचे नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानुसारच वाटचाल सुरू होती. मात्र प्रवरा सहकारी साखर कारखान्याने गणेशला हडप करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यामुळे गणेश कारखान्यांमध्ये गेल्या दहा वर्षात झालेला गैरकारभार आम्हाला जनतेला सांगावा लागला. ही आमची व्यक्तिगत लढाई नाही. असेही लहारे यांनी सांगितले.

गणेश कारखान्याच्या संदर्भात प्रवरेच्या मंडळींकडून ज्या भूमिका मांडल्या जात आहेत त्या धादांत खोट्या आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. गणेश कारखान्यासोबत झालेल्या करारातील अनेक नियमांचे प्रवरा कारखान्याने पालन केलेले नाही. मागील संचालक मंडळांनेही डोळे झाकून प्रवरा कारखान्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे देखील अनेक अडचणी उद्भवलेल्या आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात या सगळ्या भूमिका मांडत आहोत. शेवटी हा लढा आम्ही जनतेसाठी लढतो आहोत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आम्हाला आवश्यक वाटते. असेही लहारे यांनी सांगितले.

थोरात-कोल्हे घडवायला आलेत….

आम्ही गणेशच्या सभासदांनी वारंवार आग्रह केल्यामुळे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे गणेश च्या निवडणुकीत उतरले. गणेशच्या सभासदांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. कोणी बिघडवायला येत असेल आम्ही मात्र गणेश कारखान्यामध्ये घडवायला आलो आहोत. अशी भूमिका आमदार थोरात आणि विवेक कोल्हे यांनी वारंवार व्यक्त केली आहे. असेही लहारे म्हणाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!