गणेश कारखान्याच्या मदतीला आलो, मालक व्हायला नव्हे —   आमदार बाळासाहेब थोरात

तत्कालिन संचालक मंडळाच्या काळातील  कारभाराची कायदेशीर चौकशी करण्याचे ठराव..

लोकांना आडवा आणि त्यांची जिरवा हे समोरच्यांची मोहीम — विवेक कोल्हे

प्रतिनिधी —

आम्ही गणेश कारखान्याच्या मदतीला आलो, मालक व्हायला नव्हे, काळजी करू नका, गणेश चालविण्यासाठी प्रामणिक प्रयत्न करू, असा टोला माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यामान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

आमदार बाळासाहेब थोरात व संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षिक सभा कारखान्याचे विद्यामान अध्यक्ष सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त तत्कालिन संचालक मंडळाच्या काळातील सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्या कारभाराची कायदेशीर चौकशी करण्याचे ठरावही या सभेत मांडण्यात आले.

थोरात म्हणाले, की मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, विवेक कोल्हे स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत, त्यामुळे काळजी करू नका, आम्ही गणेशच्या मदतीला आलो, मालक व्हायला नव्हे, संचालक मंडळाच्या कारभारावर आमचे लक्ष राहिल. विरोधक खूप अडचणी उभ्या करतात, पण काळजी करू नका. गणेश चालविण्यासाठी प्रामणिक प्रयत्न करू.

वार्षिक सर्वसाधारण सभेत कायदेशीर ठराव केले. याबद्दल संचालक मंडळ व सभासद यांचे कौतुक करत आमदार थोरात पुढे म्हणाले, विरोधकांनी आठ वर्ष कारखाना चालविला, फायदा काय? तुमच्यावर बोजा करून ठेवला. राजकारण करताना अंत:करणात ओलावा असावा. यांचे चांगले करू असा विरोधकांचा विचारच नाही. शेवटच्या माणसाला सुखाचे दिवस कसे येतील यासाठी राजकारण करावे. गणेशचा ऊस प्रवरेला कसा नेता येईल हे पाहिले जाते. गोदावरी कालव्याचे रुंदीकरण का केले नाही. वर्गणी करूनही काम रखडले. असा सवालही आमदार थोरात यांनी उपस्थित केला.

संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, गणेशला एकेकाळी चांगले वैभव होते. स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गणेश उर्जितावस्थेत आला होता. आताही कोल्हे थोरात यांच्याकडे म्हणजेच (केटी) कडे कारखाना आला आहे. केटीवेअर म्हणजे पाणी आडवा, पाणी जिरवा त्यातून समृद्धी येते. परंतु समोरच्यांची लोकांना आडवा आणि त्यांची जिरवा ही मोहीम असते. गोदावरी दूध संघापासून ही आडवा आणि जिरवा मोहीम त्यांनी सुरू केली आहे. ते सरकारमध्ये असताना जिल्ह्यात फक्त गणेशला थकहमी दिली नव्हती. करारानंतर गणेश ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कारखाना कर्जमुक्त करण्याऐवजी कर्ज करून ठेवले. कोल्हे थोरात यांची जिरविण्याबरोबर गणेश परिसराची जिरवू नका, अशी टीका विवेक कोल्हे यांनी मंत्री विखे यांच्यावर करीत पाणीप्रश्नाचा आढावा यावेळी घेतला.

कारखान्याचे अध्यक्ष सुधिर लहारे म्हणाले, कारखान्याला जिल्हा बँकेत कर्ज मंजुर झाले. उचलायचे तर विरोधकांनी अडचण आणली. पण त्यातुन मार्ग निघेल. लहारे पुढे म्हणाले, तुम्ही गणेश चालवायला घेतला त्यावेळी विधानसभेला मोठे मताधिक्य मिळाले. मात्र कारभार चांगला केला नाही. म्हणून  कारखान्यात सत्तांतर झाले. विधानसभेला पुढे सामोरे जाणार आहात. सत्तेचा गैरवापर करुन गणेशची अडवणूक करण्यात येत आहे. गणेशनगर श्रीरामपूर रस्ता तसाच ठेवला. गणेश परिसराच्या पुर्वभागाला पाटपाणी मिळण्यासाठी उपोषण करण्याची वेळ येते. गणेश च्या कामगारांना काम न देता राहुरी व प्रवरेवरुन त्याकाळा कामगार आणत होते. असा आरोपही अध्यक्ष लहारे यांनी केला.

तत्कालिन संचालक मंडळाच्या त्या आठ वर्षातील कारभाराची कायदेशीर चौकशी करण्याचे ठराव गणेशच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले. वाढीव सहभागीदारी करारास दिलेल्या मंजुरीची मान्यताही रद्द करण्याचा ठरावही या सभेत संमत करण्यात आला.

तत्कालिन संचालक मंडळाच्या कारभारातील विविध मुद्दे सभासद सर्जेराव जाधव, आण्णासाहेब वाघे, दिलीप सातव, ज्ञानेश्वर वर्पे, संजय सरोदे, चंद्रभान धनवटे, अविनाश दंडवते, शिवशंकर कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नानासाहेब शेळके, दिलीप क्षिरसागर, शरद थोरात, शिवाजीराव लहारे, वाल्मिकराव तुरकणे, संजय गाढवे, चंद्रभान गुंजाळ, गुलाबराव गोरे, विक्रम वाघ, भगवानराव नळे, गंगाधर चौधरी, विठ्ठलराव शेळके, गाढवे, अशोक पठारे, रावसाहेब गाढवे, अदिंनी चर्चेत सहभाग घेतला. यातील ठरावही सभेने मंजुर केले. व कारवाई करण्याची मागणी संचालक मंडळाकडे केली.

सभासदांनी मांडलेल्या प्रश्नांना अध्यक्ष सुधिर लहारे, माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक ॲड. नारायणराव कार्ले, अनिल गाढवे, नानासाहेब नळे, संपतराव चौधरी, भगवानराव टिळेकर, अदिंनी उत्तर दिले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन प्रभारी कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी केले. आभार संचालक महेंद्र गोर्डे यांनी मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!