संगमनेर फेस्टिव्हल उपक्रमातील सातत्य खूप मोठे — आमदार बाळासाहेब थोरात
फेस्टिव्हलचा दिमाखदार शुभारंभ !
प्रतिनिधी —
एखादा उपक्रम सातत्याने पंधरा वर्ष राबवणं आणि त्याद्वारे एकाहून एक सरस कार्यक्रमांचे आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने याही पुढे जावून समाजासाठी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी ‘संगमनेरचा राजा’ म्हणून संबोधल्या गेलेल्या श्रींच्या देखण्या मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित करुन वेगळा पायंडाही घातला आहे. याशिवाय संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर शहर व तालुक्यात देदीप्यमान यश मिळवणार्या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा गौरव होणं ही अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या पंधराव्या वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी, उद्योजक बाळासाहेब देशमाने, संगमनेर मर्चन्ट्स बॅैंकेचे अध्यक्ष संतोष करवा, शारदा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश लाहोटी, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, ओम जाजू, मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओंकार इंदाणी, कोषाध्यक्ष व्यंकटेश लाहोटी, माजी कार्याध्यक्ष रोहित मणियार आदी मंचावर उपस्थित होते.

मनीष मालपाणी यांनी गेल्या पंधरा वर्षात संगमनेर फेस्टिव्हलच्या माध्यमातून शंभराहून अधिक दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण झाल्याचे सांगितले. गणेशोत्सवात पाच दिवस चालणार्या या सांस्कृतिक महोत्सवासाठी होणारा खर्च अफाट आहे. सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून समाज एकवटला पाहिजे, त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे असे लोकमान्य टिळकांना अभिप्रेत होते. त्यानुसार मंडळाने वेगवेगळे कार्यक्रम सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्न उपस्थित करतांना मालपाणी यांनी सद्यस्थिती विशद् केली. संगमनेरात ग्रामीणभागातून येणार्या नागरिकांची संख्या विचारात घेवून त्यांची कुचंबना रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना त्यासाठी त्यांनी मालपाणी उद्योग समूहाद्वारा मदतीचा हातही पुढे केला.

तत्पूर्वी शुभारंभाप्रसंगी फेस्टिव्हल ज्योतीचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी एकलव्य ढोल पथकाच्या सादरीकरणाने परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या वर्षभरात विविध माध्यमातून उत्तुंग कामगिरी करणार्या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा सन्मानही केला गेला.

फेस्टिव्हलच्या शुभारंभाप्रसंगी सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या दोघा संगणक अभियंत्यांच्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयावरील अभिनव कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. शिवचरित्र हे अवकाशाएवढं विशाल, भव्य आणि अथांग आहे. त्याचा आवाका फार मोठा आहे. मात्र दुर्दैवाने आपण अफजल खानाचा वध, शायिस्तेखानाची बोटं आणि आग्रा येथून सुटका या पलीकडे बघायला तयार होत नाही. या दोघांनी मात्र त्याला छेद देत छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वगुणांचे वेगवेगळे पैलू उपस्थितांसमोर उलगडतांना क्षणाक्षणाला रोमांच निर्माण केला.

जवळपास दोन तास चाललेल्या या कथानकातून शिवरायांनी दक्षिण स्वारीतून मिळविलेल्या दीर्घकालीन यशाचे गुढही या दोघांनी उलगडून दाखवले. मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी यांनी प्रास्तविकातून गेल्या पंधरा वर्षांचा धावता आढावा घेतला. प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर ओंकार इंदाणी यांनी आभार मानले.

फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी आपल्या मनोगतात शहरातील स्वच्छतागृहांच्या कमतरतेवर बोटं ठेवले. त्यासाठी स्वतः पुढाकार घेवून काही ठिकाणी आधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचीही तयारी त्यांनी दाखवली. त्याला प्रतिसाद देतांना माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वच्छतागृहांची समस्या मान्य करुन त्याची सोय करणे गरजेचे असल्याचे मान्य करीत लवकरच त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

