कळसुबाई मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी ९१ वर्षाच्या आजींचे बेमुदत उपोषण
प्रतिनिधी —
कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच तेथे येणाऱ्या भक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या ९१ वर्षाच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालया समोर आज शुक्रवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषण मागे घ्यावे यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. देवीने आदेश दिल्या शिवाय आपण उपोषण सोडणार नाही असे सांगत
या वृद्धेने उपोषण सोडण्यास ठाम नकार दर्शविला.
कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर होय. या शिखरावर कळसुबाई देवीचे छोटेसे पुरातन मंदिर आहे. कळसुबाई ही परिसरातील अनेकांचे कुलदैवत आहे. वर्षभर शिखरावर भाविकांचा राबता सुरू असतो. नवरात्रात दहा दिवस भाविकांची रीघ लागते. राज्यभरातुन अनेक गिर्यारोहक या शिखराला भेट देत असतात. शिखरावर असणारे हे मंदिर अतिशय छोटे असून एकावेळी तीन चार व्यक्ती मंदिरात जाऊ शकतात. तसेच शिखरावर येणाऱ्या भविकांसाठी अन्य कोणताही निवारा उपलब्ध नाही. बऱ्याच वेळेला भाविक, गिर्यारोहक मंदिरातच निवाऱ्यासाठी आश्रय घेतात त्यामुळे मंदीरात योग्य ते पावित्र्य राखले जाऊ शकत नाही.
या जीर्ण झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच शिखरावर भविकांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी हौसाबाई नाईकवाडी यांची मागणी आहे. आपल्या मागणीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हौसाबाई या दत्त भक्त असून तालुक्यातील पाडाळणे येथील दत्त मंदिरात त्यांचे वास्तव्य असते. त्यांचा भक्त परिवारही मोठा असून राज्यभरातून अनेक जण या दत्त मंदिरात भेट देण्यासाठी येत असतात. त्यांचे अनेक भक्त मंडळी ही यावेळी उपोषणस्थळी उपस्थित होती. तसेच अकोले तालुक वारकरी संघटनेनेही त्यांच्या या उपोषणास पाठींबा दर्शविला आहे.
अकोले वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम व राजूर च्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी सायंकाळी उपोषण स्थळी हौसा बाई नाईकवाडी यांची भेट घेतली. वनखाते त्यांच्या मागनीबाबत सकारात्मक असून कळसुबाई विकासाचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल, आपण उपोषण सोडावे ही विनंती त्यांनी हौसाबाई यांनी केली मात्र त्यांनी मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण सोडण्यास नकार दर्शविला. उपोषण स्थळी हौसाबाई नाईकवाडी यांचे अनेक भक्त तसेच वारकरी उपस्थित असून ते तेथे भजन करीत आहेत.
मंदिर परिसर वनक्षेत्रात असल्यामुळे तेथे बांधकाम करण्यास वनसंरक्षक कायद्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे समजते. तसेच कळसुबाई चे शिखर बारी गावाच्या हद्दीत असून बारी येथे अद्याप वन विकास समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळेही वनक्षेत्रात विकास योजना राबविण्यात अडचणी येत आहेत.
२५ जानेवरी रोजी बारी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. तेंव्हा या संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
Post Views: 49
