अकोले नगरपंचायत निवडणूक ;
नेत्यांची भाषणबाजी पातळी सोडणारी… अकोल्याच्या राजकारणाला न शोधणारी बोलबच्चनगिरी..
प्रतिनिधि —
अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वच नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून देखील प्रचाराच्या ‘भाषणांच्या पातळीला सुरुंग’ लागला आहे. दर्जा आणि पातळी खालावली आहे. हे अकोल्याच्या राजकारणाला शोभणारे नाही. अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील राजकारणाची पातळी खालच्या लेव्हल वर नेऊ नये, तिचा दर्जा चांगला असावा. अकोले तालुक्यातील राजकारणाची संस्कृती टिकवून ठेवावी. आदर्श पद्धतीने राजकारण करावे. असे मत तालुक्यातील तटस्थ, सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या अकोले नगर पंचायतीची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न चर्चेला आलेला आहे. विविध ठिकाणी विविध प्रभागांमध्ये सभा सुरू आहेत.
चार प्रभागांसाठी निवडणूक असली तरी ही निवडणूक नगरपंचायत पातळीवर न राहता तिने पातळी सोडली असल्याचेच दोन्हीकडच्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या निवडणूक भाषणां वरून आणि आरोप-प्रत्यारोपा वरून दिसून येते.
अकोले तालुका हा राजकीय दृष्ट्या समृद्ध आहे. वैचारिक दृष्ट्या तर अतिशय समृद्ध आहे. सर्वच पक्षांचे राजकारण या ठिकाणी चालते. विशेषतः संघर्षाचे राजकारण या तालुक्यात अतिशय पूर्वापार परंपरेने चालत आलेले आहे. संघर्ष प्रत्येक पक्षाच्या पाचवीला पुजलेला आहे. अकोले ही संघर्षाची भूमी आहे. असे असताना गेल्या दोन-तीन वर्षात आमदार पिचड हे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राजकारणातील भाषणांची, आरोप प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणीची पातळी घसरलेली दिसते.
ती अकोलेच्या राजकारणाला शोभत नाही. अशा प्रतिक्रिया येथील सूज्ञ जनते कडून, शिक्षक-प्राध्यापक, व्यापारी, अगदी विद्यार्थ्यांकडूनही आणि जाणत्या मंडळींकडून ऐकण्यास मिळतात.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत दस्तुरखुद्द माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या भाषणांमधून भाषेचा तोल ढासळलेला दिसतो. ज्येष्ठ नेते पिचड यांच्या भाषणात असे मुद्दे पूर्वी फार कमी येत असत. परंतु नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या भाषणात आलेले मुद्दे हे अकोलच्या राजकीय परंपरेला शोभत नाहीत. असे मत बरेच जण व्यक्त करतात.
मुळात नगरपंचायती सारख्या साधारण निवडणुकीत एवढ्या ज्येष्ठ माजी मंत्र्यांना उतरवणे व त्यांच्याकडून भाषण करून घेणे हेच योग्य नाही. पिचड यांचे वय आणि त्यांची तब्येत पाहता सर्वांनीच त्यांची काळजी घेणे आता गरजेचे आहे. अशाही भावनिक प्रतिक्रिया काही जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.
नगरपंचायतीचे राजकारण हे विकासाच्या मुद्द्या ऐवजी आता व्यक्तिगत हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप यावर येऊन पोहोचले आहे. या आरोप-प्रत्यारोपांनी देखील व्यक्तिगत टीकेची पातळी सोडलेली आहे. ही पातळी अजिबात योग्य नाही. भाषणांचा दर्जा देखील योग्य नाही आणि अकोलेकरांच्या दृष्टीने तर हे अजिबात योग्य नाही.
या नेत्यांना झालंय तरी काय ? असा सवाल सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे. नगरपंचायतीची निवडणुक नगरपंचायतीच्या पातळीवरच असायला हवी. परंतु तसे न होता ती एकमेकांच्या घरात घुसली आहे. थेट भावकीत जाऊन बसली आहे. चुलीपर्यंत गेली आहे.
कोण कोणाला मेंटल म्हणत आहे, तर कोण कोणाला म्हातारपणात साठी बुद्धी नाठी झाल्याचा प्रकार असल्याची टिका करत आहेत. भाषणाच्या या पातळी मुळे निवडणुकांना राजकीय स्वरूप असण्या ऐवजी “बोलबच्चनगिरी” चे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातील नेत्यांनाही शोभणारे नाही हे मात्र नक्की.
