संगमनेर नगरपालिका निवडणूक ;
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता धूसर…
काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या तयारीत…
प्रतिनिधि —

नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्याचे मनसुबे असणाऱ्या इतर पक्षाच्या पुढाऱ्यांना आता अडचण होणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस, शहर आणि ग्रामीण काँग्रेसला आदेश काढले असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात याव्यात त्यासाठी इच्छुक उमेदवारांची माहिती कार्यालयाकडे पाठवावी असे बजावण्यात आलेले आहे.
हे पत्र दोनच दिवसांपूर्वीचे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करेल किंवा नाही याबाबत साशंकता आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात अकोले येथे नगर पंचायतीची निवडणुक काही प्रभागत नुकतीच पार पडली आहे. चार जागांसाठी अद्याप निवडणूक चालू आहे. येथे काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली नाही. त्यामुळे या पत्राच्या आधीपासूनच काँग्रेसची भूमिका आघाडी न करण्याची होती काय ? असा कयास बांधला जात आहे.
संगमनेर नगरपालिकेचे मुदत संपली असून नगरपालिकेवर सध्या प्रशासक राज्य करीत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी केली आहे.
संगमनेर नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.
मागील पाच वर्षे नगरपालिकेमध्ये भाजपच्या एकमेव महिला सदस्य होत्या.
संगमनेर नगरपालिकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे मेहुणे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे पूर्ण वर्चस्व आहे. थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे या नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे नगरपालिकेवर पुन्हा थोरात वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतील.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यामध्ये पण थोडासा गडबड गोंधळ आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना थोरात यांच्या बरोबर नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडी नको आहे. तर काही पदाधिकाऱ्यांना आघाडी हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे. आघाडी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा स्वार्थ नेमका काय आहे हे निवडणुकीत दिसून येईल. काहींना आपल्या नातेवाईकांना सहजासहजी निवडून आणायचे आहे. त्यासाठी काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून निवडून येण्याचा मार्ग सुकर करायचा आहे.
काँग्रेसची ताकद पाहता संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला किती जागा मिळतील हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता या दोन्ही पक्षांकडून काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रस्ताव देण्यात येईल. आणि बळेबळे आघाडी झालीच तर या दोन्ही पक्षांना एक किंवा दोन जागांवर समाधान मानावे लागले अशी शक्यता आहे. या दोन्ही पक्षांना काँग्रेसबरोबर आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही.
काही पदाधिकाऱ्यांची तर आघाडी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मनधरणी करून काही करून, प्रसंगी हातापाया पडून आघाडी करावी अशी इच्छा असल्याची चर्चा आहे. आघाडी झाली नाही तर या पक्षांना राजकीय संकटांना सामोरे जावे लागेल.
या पक्षांना “राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी करो या मरो” सारखीच परिस्थिती आहे.
