यंदा बैलपोळ्यावर महागाई आणि दुष्काळाचे सावट !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
पोळा सण शेतकऱ्यांसाठी वर्षभरातला सर्वांत महत्त्वाचा सण समजला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदा महागाई आणि दुष्काळाच्या सावटाखाली दबला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे भाव वाढले आहेत. विविध ठिकाणी आठवडे बाजारात पोळ्यासाठी साहित्य विक्रीची दुकाने सजली असली तरी महागाईमुळे शेतकऱ्यांचा सध्यातरी थंड प्रतिसाद दिसत आहे.

पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी महागाईमुळे जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. गायब झालेल्या पावसामुळे खरिप पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या लम्पी या चर्मरोगाची सुद्धा शेतकऱ्यांना धास्ती असून या रोगाचे सावट देखील बैलपोळ्याच्या सणावर आहे.

ट्रॅक्टरचा शेतीच्या प्रत्येक कामांसाठी उपयोग वाढल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होऊन सणाची व्यापकताही कमी झाली आहे. त्यामुळे साजश्रृंगाराच्या सहित्याला परिणामी शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक असून खरीप हंगामात केलेला खर्च पदरात पडणे कठीण आहे. अनेक शेतकरी उधारी-उसनवारी करून पोळा सणासाठी बैलजोडीच्या साजाची खरेदी करत आहेत. बैलांचे शेती व्यवसायात विशेष महत्त्व असल्याने ते शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते.

वेसण, कासरा, मोरखी, कवडी गेठा, गोंडा, घागरमाळ, भोरकडी, झुली, हिंगुळ याचबरोबर इतर महत्त्वाच्या साहित्यांचे देखील भाव २० ते ३० टक्के वाढले असल्याने शेतकऱ्यांसमोर पोळा सण साजरा करण्यासाठी चिंता वाढली आहे.

