दुधाला किमान भाव ३४ रुपये देण्याची अंमलबजावणी २१ जुलैपासून सुरू !
अमृतसागर दूध संघाचा निर्णय
प्रतिनिधी —
राज्य सरकारने अलीकडेच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च लक्षत घेऊन गाय दुधाला किमान खरेदी दर ३४ रुपये निश्चित केले. हा निर्णय सहकारी संस्थां बरोबरच खाजगी दूध प्रकल्पांनाही बंधनकारक असल्याने अकोले येथील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ यांनी दि.२१ जुलै २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.

अमृतसागर दूध संघाची आज संचालक मंडळाची विशेष बैठक आज संघाच्या सभागृहात पार पडली. यामध्ये शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. राज्य सरकारने २७ जून २०२३ रोजी याबाबद निर्णय घेतला. राज्यातील दूध दर प्रश्ना संदर्भात विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी सोबत राज्याचे पशसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संस्था कडून करण्यात येते. यातील काही लोक शेतकऱ्याचे दूध कमी भावाने खरेदी करतात यामुळे दुध उत्पादक शेतकरी तोट्यात जातो. यासाठी हा ३.५ / ८.५ गुण प्रती करिता सर्वानुमते किमान दूध खरेदी दर निश्चित करून शासनास शिफारस करण्यात आली.
त्या नंतर हा निर्णय राज्य सरकारने घेतला असून प्रती लिटर विना कपात ३४ रुपये गाय दुधा करिता खरेदी दर असणार असून याची अंमलबजावनी करण्यासाठी दूध संघाने बैठक घेऊन दि.२१ जुलै २०२३ पासून हा दर लागू करण्यात येणार आहे.

बैठकीस व्हॉईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक गोरक्ष मालूजकर, शरद चौधरी, आनंदराव वाकचौरे, आपासाहेब आवारी, रामदास आंबरे, जगन देशमुख, अरुण गायकर, बबन चौधरी, गंगाधर नाईकवाडी, सुभाष डोंगरे, बाबुराव बेनके, अश्विनी धुमाळ, सुलोचना औटी, दयानंद वैद्य, बाळासाहेब मुंडे, कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत उपस्थित होते.

