संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार !
प्रतिनिधी —
काळाची आव्हाने पेलू शकणारा नवयुवक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करण्याची सर्वप्रथम संधी संगमनेर महाविद्यालयाला मिळाली आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली.

शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे पुढील प्रमुख फायदे संगमनेर तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहेत.
१) विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य उपलब्ध होईल. पारंपारिक पद्धतीत विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या इतर विद्याशाखांचे विषय निवडण्याची सोय नव्हती. सन २०२३ – २४ पासून संगमनेर महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या / तिच्या आवडीच्या इतर विद्याशाखेचे अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
२) विद्यार्थ्याला आपल्या आवडीचे मर्यादित कालावधीचे अभ्यासक्रम स्वायत्त महाविद्यालयात पूर्ण करता येतात.

३) विद्यार्थ्याला मातृभाषेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची सोय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाविद्यालयात करण्यात आली आहे. पारंपारिक अभ्यासक्रमात इंग्रजीची अनावश्यक सक्ती होती.नवीन शैक्षणिक धोरणात सर्व विषयांना समान न्याय देण्यात आला आहे. कोणताही विषय अथवा कौशल्य कमी महत्वाचे मानलेले नाही. याचा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी होईल.
४) महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू व परदेशात इंटरशिपची सोय यापूर्वीच करण्यात आलेली आहे. महाविद्यालयातील बी व्होक अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी युरोपमधील अनेक देशात कार्यरत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना अश्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होतील.

५) महाविद्यालयाला रोजगाराभीमुख व कौशल्याधिष्ठित शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा आहे. महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हमखास नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना महाविद्यालयात अश्या प्रकारचे अभ्यासक्रम अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. सध्या ६३ विविध प्रकारचे कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( Certificate Course ) राबविले जात आहेत. तसेच पाच विविध विषयातील बी व्होक पदवी अभ्यासक्रम राबविले जातात.

६) नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पदवी घेण्याची नगर जिल्ह्यात केवळ संगमनेर महाविद्यालयातच संधी उपलब्ध आहे. या पद्धतीत विद्यार्थ्याला काही कारणाने शिक्षण सोडावे लागल्यास तो शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. विद्यार्थ्याने पदवीचे पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला सर्टिफिकेट मिळेल. दुसरे वर्ष पूर्ण केल्यावर डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिले जाईल व तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र मिळेल. विद्यार्थ्याला तीन वर्षाची अथवा चार वर्षाची पदवी घेण्याचे स्वातंत्र्य असेल. चौथ्या वर्षांच्या पदवीचा पर्याय विद्यार्थ्याला असेल. त्याला ऑनर्स तथा संशोधनाची पदवी मिळेल. चौथ्या वर्षाची संशोधन पदवी विद्यार्थ्यांने घेतल्यास त्याला पीएचडी करता येईल. महाविद्यालयातील विविध ११ विषयांच्या संशोधन केंद्रामधून ६३ संशोधक मार्गदर्शक २२७ पेक्षा जास्त संशोधक विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करत आहेत.
७) गरीब होतकरू, गरजू विद्यार्ध्यांसाठी कमवा व शिका योजनेअंतर्गत मागेल त्याला काम देऊन विद्यार्थ्यांच्या आर्थिक समस्या दूर करण्याच्या प्रयत्न केला आहे. तसेच आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय विद्याधन कलश योजना सुरु केलेली आहे.

