अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…!
कुठलाही गुन्हा नसताना केवळ पूर्वग्रहातून पोलिसांनी कारवाई केली असल्याचा आरोप…

मुळ प्रश्न हा आहे की, त्यांना ताब्यातच का घेतले? स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही केवळ जात पारधी असणे हे संशयाचे कारण असु शकते का, भारतीय संविधानाच्या कलम १४ ने बहाल केलेल्या समानतेचा अधिकार असेल, कलम १५ नुसार भेदभाव न होण्याचा अधिकार असेल, कलम १९ नुसार देशात कोठेही मुक्त संचार करण्याच्या स्वातंत्र्याचा अधिकार असेल, कलम २१ नुसार प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार असेल याचे उल्लंघन कुठवर होणार आहे? आपण पारधी समाजाला चोरीच्याच चष्म्यातून अजुन किती वर्षे पहाणार आहोत या प्रश्नांची उत्तरे संबंधित पोलिस प्रशासनाला द्यावीच लागणार आहेत. पण गरजेचं आहे दिगंबर काळे सारख्या एकाने ठामपणे आणि निर्भिड पणे आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणे आणि सर्वांनी माणुसकीच्या नात्याने असे अन्याय अत्याचार बंद होतील यासाठी सामुहिक प्रयत्न करणे.
प्रमोद काळे, अध्यक्ष, लोकशिक्षण प्रतिष्ठान

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी केवळ पूर्वग्रहातून आदिवासी पारधी समाजातील लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते या सर्वांची सुटका करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी लाखो भाविक आळंदी येथे जमतात आणि मनोभावे माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्यात आदिवासी पारधी समाजातील जवळपास १५० लोक सहभागी झाले होते. त्यात महिला, गरोदर माता, लहान मुले मुली, वयोवृद्धांसह तरुणांचा समावेश होता. या पारध्यांपासुन वारीतील लोकांना चोरीचा धोका आहे. या पुर्वग्रहातुन आदिवासी पारधी समाजातील या लोकांना चुकीच्या पद्धतीने नजर कैदेत ठेवले गेले. वास्तविक पाहता यापैकी कोणीही रेकॉर्ड वरील गुन्हेगार नव्हते आणि गमतीदार आणि तितकीच गंभीर गोष्ट म्हणजे आळंदी पोलिस स्टेशनच्या समोर जे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल लोकांचे दोन बॅनर लावले आहेत त्यात एकही आदिवासी पारधी समाजातील नाही. मात्र प्रतिबंधात्मक कारवाईतील सर्वजण पारधी होते.

हा सर्व प्रकार उघडकीस आला लोकशिक्षण प्रतिष्ठानचा कार्यकर्ता दिगंबर काळे याच्यामुळे, दिगंबर काल त्याच्या पत्नी सोबत आळंदी येथे गेला होता. त्याला बेकायदेशीर पणे ताब्यात घेतल्यानंतर केल्यानंतर त्याने सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर एकच खळबळ माजली. क्रांती संस्थेच्या अध्यक्षा सुनिता भोसले, संविधान प्रचारक मनिष देशपांडे,जयश्री काळे, जितेंद्र काळे व अमोल भोसले यांच्या सह आळंदी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन वस्तुस्थितीची पडताळणी केली.. दुपार पर्यंत अरेरावीची भाषा करणारे पोलिस प्रशासन राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून आलेल्या दबावामुळे त्यांना नमते घ्यावे लागले व रात्री उशीरा सर्वांची सुटका केली.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष निलम गोऱ्हे, जेष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, ॲड. असीम सरोदे, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष लोंढे, मुमताज शेख, ॲड. विंदा महाजन, ॲड. उषा पवार यांच्यासह राज्यातील सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि विधी सेवा क्षेत्रातील अनेक जण थेट या प्रकरणात पिडीतांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते.

