राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम बीओटी तत्त्वावर देण्यास विरोध !

बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) चा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी —

अकोले तालुक्यातील राजुर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम बीओटी तत्वावर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रस्तावास बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) यांनी तीव्र विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सर्व विभागांना निवेदन दिले आहे.

दरम्यान बिरसा ब्रिगेड संघटनेतर्फे शाळेच्या दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपयांचा निधी देणगी स्वरूपात देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजूर येथील शाळेच्या मालकीचा ९ गुंठे क्षेत्रफळ असलेला भुखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर खाजगी विकासकास देण्यात येणार आहे. त्याबदल्यात विकासकाकडून ४९ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या शाळेच्या दुसऱ्या भूखंडावर वर्ग खोल्यांचे बांधकाम करून देण्यात येणार आहे.

त्या बांधकामाचा खर्च ५ कोटी रुपये प्रस्तावित आहे. त्या बदल्यात खाजगी विकासकास जो ९ गुंठे क्षेत्रफळ असलेला भुखंड देण्यात येणार आहे. त्याची बाजार भावाप्रमाणे किंमत कोट्यावधी रूपये आहे. त्यामुळे या व्यवहारात प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा आहे.

राजुर ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रात येत असल्याने त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जल, जंगल, जमीन आणि इतर प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांवर पेसा ग्रामपंचायतीची मालकी असते. पेसा ग्रामसभेच्या अनुमतीशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार, व इतर कोणतीही शासकीय यंत्रणा खाजगी विकासकामार्फत कोणतीही कामे करू शकत नाही. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा याद्वारे

शाळेचे बांधकाम करणे हे पेसा कायद्याचे उल्लंघन आहे. भारतीय राज्य घटनेनुसार शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे शिक्षण हक्क अधिनियम २००९ या कायद्यानुसार ११ मानांकनाची पुर्तता करणे ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे.

खाजगी विकासकामार्फत राजुर येथील जि. प. प्राथ.शाळा वर्ग खोल्यांचे बांधकाम करणे पेसा कायदा, भारतीय राज्यघटना आणि शिक्षण हक्क अधिनियम २००९ यांचे उल्लंघन आहे. त्यामुळे वरील प्रकारच्या प्रस्तावास बिरसा ब्रिगेड चा तीव्र विरोध आहे. पेसा क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या खासगीकरणाला बिरसा ब्रिगेड तीव्र विरोध करेल. आपण या अर्जाची दखल न घेतल्यास बिरसा ब्रिगेडतर्फे तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन केले जाईल याची दखल घ्यावी.

दशरथ गभाले, साधना वाळेकर, दीपक देशमुख, संतोष मुर्तडक, हेमंत मोहंडुळे, सुरेश देशमुख, किरण नवाळी, सचिन मुर्तडक, शिवाजी देशमुख, दत्तात्रय देशमुख, यशवंत देशमुख, राजू चोथवे, देवेंद्र देशमुख, श्याम देशमुख, आनंदा देशमुख, तुकाराम भिवा घोरपडे, लहू मारुती गभाले आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!