आधी दुष्काळी भागाला पाणी द्या आणि मग उद्घाटनाचे सोहळे करा — आमदार बाळासाहेब थोरात
जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अन्यथा उद्रेक होईल

जीवनाचे ध्यास पर्व मानून आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांसाठी मोठा निधी मिळवून ऑक्टोबर २०२२ मध्ये पाणी देण्यासाठी रात्रंदिवस युद्ध पातळीवर काम सुरू होते .मात्र राज्यात सरकार बदलले आणि कालव्यांच्या कामांची गती मंदावली आहे.यामुळे दुष्काळी भागात तीव्र संताप निर्माण झाला आहे..

प्रतिनिधी —
भागात असलेल्या १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले असून कालव्यांची कामे आपण अनेक अडचणीवर मात करून पूर्णत्वास आणली. मात्र फक्त श्रेय वादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात असून नवीन कालव्यांमधून दुष्काळी भागातील जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा असे खरमरीत पत्र निळवंडे धरणाचे जनक आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छित असून दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आलेले आहे. सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी आपण दुष्काळी भागाला देऊ शकतो, मात्र केवळ पंतप्रधान महोदयांचा उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे.

निळवंडे धरण आणि डाव्या कालव्याचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आपले सरकार आल्यानंतर उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे, त्याला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. कडक उन्हाळा आहे. शिवाय मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारलाही या भविष्यकालीन दुष्काळाची तीव्रता माहित आहे. त्यामुळे दुष्काळी भागाचे हक्काचे दहा टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील बांधवांना मिळणे अत्यावश्यक आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर या पाण्याचा दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. आपण तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना माहीत आहे, धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. जनतेच्या मनातली ही भावना आपण समजून घ्यावी. हवेतर नंतर सवडीनुसार आदरणीय पंतप्रधानांना बोलवावे, उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम करावा त्याला आमची अजिबात हरकत नाही. मात्र हक्काचे दहा टीएमसी पाणी हे त्वरित दुष्काळी भागातील जनतेला देण्याचे पुण्यकर्म आपण करावे, अशी मागणी दुष्काळी भागातील तमाम शेतकरी बांधव, नागरिक व महिला यांच्या वतीने आपण सरकारकडे करत असल्याची मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

