संगमनेर महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ फलकाचे अनावरण
प्रतिनिधि
तरुणांनी महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेताना करिअर कट्टाच्याविविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नोकरी व स्वयंरोजगार याविषयी स्वतःला भविष्यात सक्षम बनवावे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ.अनिल राठी यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयामध्ये ‘करिअर कट्टा’ फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ.रवींद्र ताशिलदार,
गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.श्रीहरी पिंगळे, कार्यक्रम समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ.गोरक्षनाथ सानप, सहसमन्वयक प्रा.उत्तम खर्डे, डॉ.गणेश जैतमल, प्रा.शहाजी लेंडे, प्रा.चिन्मय तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.राठी म्हणाले की, संघर्षाशिवाय जीवनात सहजासहजी काहीही मिळत नाही याची जाणिव विद्यार्थ्यांनी नेहमी ठेवावी. कठोर परिश्रम करावे पण योग्य दिशेने जाणारे परिश्रम माणसाला यश प्राप्त करुन देतात. कल्पनेला जिद्दीचे पंख जोडा म्हणजे सुयश आपोआप प्राप्त होते.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टाच्या ‘आय.ए.एस. आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला’ आणि विविध दर्जेदार कौशल्य विकास उपक्रमांचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर आùनलाईन पध्दतीने केले जाते. याचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा त्यासाठी शिक्षण प्रसारक संस्था सदैव आपल्या पाठीशी आहे, असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.अरूण गायकवाड यांनी स्वायत्त महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख विविध बी.व्होक. व्यावसायीक कोर्सेस व कौशल्य विकास कोर्सेसच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असते. तसेच आपल्यातील कौशल्य व कला गुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
डॉ.अनिल राठी यांच्या हस्ते करिअर कट्टाचे विद्यार्थी आकांक्षा सातपुते, प्रतिक पावडे व रोशन फड यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना स्टार्टअप सेलचे व करीअर कट्टाचे समन्वयक डॉ. गोरक्षनाथ सानप यांनी महाविद्यालयात राबविण्यात
येणा-या करिअर कट्टाच्या विविध उपक्रमांची माहिती व फायदे सांगुन अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा.शहाजी लेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय काशिद व शिक्षकेतर सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
