खोदलेल्या निळवंडे कालव्यासह बाजूच्या रिकाम्या प्लॉट मधून गौण खनिजाची चोरी !

 

संगमनेरचा महसूल विभाग अंधारात

 

संगमनेर मधील गौण खनिजाचे अवैध उत्खनन, वाळू तस्करी यावर महसूल विभागाने कडक बंधने आणली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी असलेले स्टोन क्रशर बंद करण्यात आले असून त्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाई विरोधात मोर्चा देखील निघाला होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेत वाळू माफिया आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत कायदेशीर कारवाई करणारच असे स्पष्ट केले आहे. असे असले तरी संगमनेर तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरूच असल्याचे उघड झाले आहे. इतरही ठिकाणी अशी चोरी सुरू असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

प्रतिनिधी —

संगमनेरच्या महसूल विभागाने गौण खनिज उत्खननाला बंदी घातलेली असताना देखील संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील निळवंडे धरणाच्या कालव्यासह आजूबाजूच्या रिकाम्या प्लॉट मधून मुरूम, माती, डबर, दगड गौण खनिजाची चोरी होत असल्याचे उघड झाले असून लाखो रुपयांचे गौण खनिज चोरट्यांनी लांबवले आहे. याप्रकरणी संगमनेर शहरातील नागरिकांनी तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे तक्रार केली आहे.

संगमनेर तालुक्यातील सर्वे नंबर ४५ याचा जुना सर्वे नंबर १८६ माझे घर हाऊसिंग सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या प्लॉट मधील आणि त्याच्या जवळून जाणाऱ्या निळवंडे कालव्यातून काढलेला मुरूम, दगड काही दिवसांपासून चोरी करण्याची घटना सुरू आहे. अद्यापही ही चोरी थांबलेली नाही.

तालुक्यातील एका बिल्डरने हा मुरूम, दगड आणि गौण खनिज चोरले असल्याची शक्यता असून त्या संदर्भात तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे.

तक्रार अर्जात म्हटले आहे की, वरील ठिकाणी आमच्या मालकीच्या जागा असून त्याची मोजणी होऊन सरकारने कालव्याचे काम चालू केलेले आहे. त्यातून निघालेला मुरूम, दगड तसेच माती व इतर गौण खनिज आमच्या प्लॉटमधील मुरूम उकरून काढून तसेच निशाणीचे पोल तोडून वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे खड्डे करून करून चोरण्याचे काम सुरू आहे.

सदर चोरीस गेलेल्या मुरुमाचा व दगडाचा शोध घेतला असता ते गौण खनिज संगमनेर साखर कारखान्याच्या मुख्य गेट समोरील (पुणे नाशिक महामार्ग जुना) गुंजाळवाडी – वेल्हाळे रोड या ठिकाणी असलेल्या प्लॉटवर नेऊन टाकण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

तरी या संदर्भात चौकशी करून सरकारी गौण खनिज बाबत योग्य ती कारवाई करावी व संबंधित चोरांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या निवेदनावर आदिनाथ गोरखनाथ भांदुर्गे, सुनील हिरामण बाप्ते, चंद्रकला केदारनाथ मालपाणी, अनिल कृष्णराव जोशी यांच्या सह्या आहेत.

तसेच तहसीलदारांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या प्रती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर आणि प्रांत अधिकारी संगमनेर यांना देखील पुढील कारवाईसाठी देण्यात आलेल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!