आदिवासी आश्रम शाळेतील ३१२ विद्यार्थिनी आजारी पडल्या !
राजुर प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकण्याचा सुनीता भांगरे यांचा इशारा…
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पातील पैठण येथील शासकीय आश्रमशाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे सुमारे ३१२ विद्यार्थिनी आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान आश्रमशाळेत आरोग्याबरोबर भोजन व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास राजूर आदिवासी प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा माजी जि.प.सदस्या सुनिता भांगरे यांनी दिला आहे.
वसतिगृहात स्त्री अधिक्षक जवळपास सहा महिन्यांपासून नसल्यामुळे विद्यार्थीनीच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाअतंर्गत पैठण शासकीय आश्रमशाळेत सुमारे ४१७ विद्यार्थिनी आहेत. गेल्या आठवडाभरापासून आश्रमशाळेत काही विद्यार्थिनी थंडी, ताप, खोकला, उलट्या आणि जुलाबाने आजारी पडल्याने त्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोतुळ ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. तर काही विद्यार्थिनी आपल्या गावी घरी गेल्याचे हजेरी समजले आहे. मुली आजारी पडल्याने त्यांचे पालक चिंतेत आहेत. ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान आश्रमशाळेमध्ये मुलींना निकृष्ट जेवण आणि आरोग्याच्या गंभीर समस्या असल्याचे विद्यार्थिनींकडून समजताच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनिता भांगरे यांनी आश्रम शाळेला अचानक भेट दिली. या भेटीमध्ये आश्रम शाळेत स्त्री अधिक्षिका पद रिक्त असल्याचे आढळून आले. चतुर्थ वर्गाच्या स्त्री कर्मचारी सुमारे ४०० विद्यार्थिनी सांभाळत आहेत.

मुलींना दिल्या जाणाऱ्या जेवाणामध्ये खडे, आळ्या, सोंडे आढळून येत असल्याची माहिती येथील विद्यार्थिनींनी दिली. याची गंभीर दखल घेत भांगरे यांनी प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांना आश्रम शाळेत निकृष्ट जेवण व आजारी पडलेल्या मुलींबाबत माहिती देऊन लक्ष घालण्याची सूचना केली.

या बाबत कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वानखेडे यांनी पैठण आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना टायफाईड, थंडी, ताप, खोकला, डायरियामुळे आजारी पडल्या असल्याची माहिती दिली. आठ दिवसात अनेक मुलींची तपासणी केली आहे. तसेच मुलींच्या आजाराबाबत शिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे यांना कल्पना दिल्याचेही वानखेडे यांनी सांगितले.

पैठण शासकीय आश्रम शाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आजारी पडल्या होत्या. कोतुळ ग्रामीण रुग्णालय व आंभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन त्या आता बऱ्या झाल्या आहेत. काही मुलींना आरामासाठी घरी सोडण्यात आले असून मुलींची तब्येत व्यवस्थित आहे.
राजन पाटील, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग राजूर.
—
आदिवासी विकास विभाग आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असताना मुलींच्या आरोग्याची अशी हेळसांड होणे हा प्रशासनाचा दोष आहे. सेंट्रल किचनमधुन येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता ही निकृष्ठ असल्याचे विद्यार्थीनीच्या संवादातून लक्षात आले. निवासी कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे आश्रम शाळेतील समस्या वाढतच चालल्या आहेत. प्रशासनाने आपले कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्षात या बाबत गंभीर होणे गरजेचे आहे.
सुनिता भांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजूर

