श्रेय घेण्यापेक्षा प्रशासकीय मान्यतेला पाच महिने उशीर का झाला — आमदार थोरात यांचा मंत्री विखे यांना सवाल

निळवंडे कालव्यांचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे लाभधारकांना माहित आहे 

प्रतिनिधी —

निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली, महाविकास आघाडी सरकारच्या काळातच, सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सरकारने ही मान्यता द्यायला पाच महिने उशीर केला त्यामुळे लाभ क्षेत्रातील कामे रखडली, उशिरा का होईना सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार मात्र आता तरी निळवंड्याच्या विरोधकांनी लाभधारक शेतकऱ्यांच्या वाटेत विघ्न आणू नये, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे स्वागत केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गतिमान झालेले निळवंडे कालव्यांचे काम शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर खोळंबले होते. आज मंत्रिमंडळ बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली त्यामुळे निळवंडे कालव्यांचे काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला. यासंदर्भात माजी मंत्री थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे सरकारचे अभिनंदन केले आणि भविष्यात तरी निळवंडे कामांच्या कालव्यात विघ्न आणू नका असेही सुनावले.

जानेवारी २०२२ मध्ये निळवंडे कालव्यांच्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला दिवाळीपूर्वीच मान्यता मिळणे अपेक्षित होते मात्र सरकारने दिरंगाई केली. त्यामुळे निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम गेले पाच महिने रखडले होते. मी या विषयात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. मागील पाच महिने काम सरकारच्या चुकीमुळे रखडले याचा कबुली जबाब पालकमंत्री महोदयांनी देणे अपेक्षित आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आणि लाभधारकांना निळवंडे कालव्यांचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे माहित आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही डाव्या आणि उजव्या या दोनही कालव्यांच्या कामाला गती दिली, मात्र सध्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे काम मंदावलेले आहे, आता सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर तरी या दोनही कालव्यांतून वेळेत पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा.

महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतरही मी सांगितले होते की कोणी कितीही विघ्न आणले तरी निळवंडाचे काम अडवू शकणार नाही. ती बाब आज स्पष्ट झाली. मात्र न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा आटापिटा पालकमंत्री महोदयांनी लावला आहे. जनतेच्या मनात कितीही संभ्रम निर्माण केला तरी जनतेला सत्य काय ते माहित आहे. पुढील काळात निळवंडे कालव्यांच्या कामात विघ्न आणले नाही तरीसुद्धा लाभधारक शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे होईल, असाही टोला थोरात यांनी नामोल्लेख टाळत मंत्री विखे यांना लगावला.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!