आपल्या शेजारचे मंत्री वाळू माफीयांच्या सम्राटांचे पाठीराखे !
आमदार बाळासाहेब थोरात यांची मंत्री विखे पाटलांवर घनाघाती टीका
प्रतिनिधी —
आपल्या शेजारच्या मंत्र्यांना आपल्या शिवाय करमत नाही. आपल्यावर टीका केली नाही, काही बोलले नाही तर त्यांना मोडशी होते की काय असा प्रकार आहे. वाळू माफियांवर बोलणारे हे वाळू माफियांच्या सम्राटांचे, वाळू माफिया किंगचे पाठीराखे आहेत. या लोकांना कोणाचे आशीर्वाद आहेत हे जनतेला माहित आहे. हनुमंत गावातून प्रवरा नदी अक्षरशः धुऊन नेली आहे. येथील वाळू उपसा सर्वसामान्य जनतेला माहित आहे. तिथल्या वाळू माफियांना, माफिया सम्राटांना कोणाचे आशीर्वाद आहेत हे देखील जनतेला माहित आहे. वाळू माफिया सम्राटांना खोटे परवाने कोणी मिळवून दिले हे देखील माहित आहे. अशी घनाघाती टीका माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली आहे.

खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर संगमनेर मध्ये आलेले आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मधील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व जंगी स्वागत करण्यात आले. काँग्रेसचा विचार हाच सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा व आपला विचार असून हा विचार पुढे न्यायचा आहे. जिल्ह्यात विकास कामांना खीळ घालून जे दहशतीचे राजकारण सुरू आहे ते जिल्हा कधीही खपवून घेणार नाही असेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्यातील जनतेच्या वतीने झालेल्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर होती. ३८१ किलोमीटर झालेली ही पद यात्रा अत्यंत यशस्वी झाली. यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अत्यंत चांगल्या नियोजनाची देश पातळीवर चर्चा झाली. या नियोजनामध्ये सत्यजित तांबे यांनी मोठा सहभाग घेतला. पदवीधर निवडणुकीनंतर आपण वरिष्ठांना पक्ष मजबुतीसाठी पत्र लिहिली असून तो पक्ष पातळीवर निर्णय होईल. मात्र माध्यमांनी त्याला जास्त प्रसिद्धी दिली. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून याच विचारातून आपण पुढे जाणार आहोत.

सत्ता येते आणि जाते. इतक्या वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात आपण कधीही कुणाची वाईट केले नाही. मात्र काही लोक राज्याचे मंत्री आहेत की तालुक्याचे ते कळत नाही. त्यांचा राग फक्त संगमनेर तालुक्यावर आहे.संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील विकास कामे त्यांनी थांबवली आहेत. हे दहशतीचे राजकारण जिल्हा कधीही सहन करणार नाही. जनता कधीही त्यांच्या दहशतीचे राजकारणाचे झाकण उडवून देईल.

ऑक्टोबर २०२२ मध्येच निळवंडे धरणाचे पाणी आणायचे होते. मात्र या कामासाठी लागणारी खडी थांबवली असल्याने कालव्यांच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकास कामे बंद पडली आहेत. संगमनेर तालुका हा संघर्ष करणारा आहे. जिद्दीने लढणारा आहे. कितीही अडचणी आणल्या तरी संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार आहे.

सुसंस्कृत व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची संगमनेर तालुक्याच्या राजकारणाची परंपरा आहे. या संस्कृतीचा राज्यात सन्मान होतो. आहे. डॉ.सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यातील ५४ तालुक्यांमध्ये निर्माण केलेला जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध यामधून सत्यजित तांबे यांना मोठी मदत झाली असल्याने डॉ.तांबे यांच्या कामाचा व संगमनेरच्या राजकारणाचा वारसा सत्यजित तांबे जोपासतील असेही ते म्हणाले.

