आदिवासी विकास मंत्र्यांच्या घरावर १० फेब्रुवारी रोजी मोर्चा ! 

अहमदनगर जिल्ह्यातून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार !

प्रतिनिधी–

महाराष्ट्रामध्ये  आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. आदिवासी प्रश्नांसाठी दिनांक १० फेब्रुवारी रोजी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार निवासस्थानी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, कोपरगाव व पारनेर तालुक्यातून श्रमिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत.

बोगस आदिवासींची घुसखोरी, आश्रमशाळा, वसतिगृहे व शिक्षणाचे प्रश्न, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, बाळहिरडा व इतर वन उपज यांच्या हमीभावाचा प्रश्न, आदिवासी श्रमिकांची बेरोजगारी आणि कुपोषणाचा प्रश्न, आदिवासी वाड्या-पाड्यांवर आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रश्न, अशा असंख्य समस्यांनी आदिवासी समुदाय त्रस्त झाला आहे.

या सर्व गोष्टींकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करत आहे. तसेच आदिवासी विकास मंत्री आदिवासींच्या विकासाची भूमिका घेण्याऐवजी आदिवासीविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्याचा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना जाब विचारण्यासाठी शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी नंदुरबार येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या झेंड्याखाली विविध संघटना एकत्र येत मोर्चा काढत आहेत. आपण सर्वांनी या मोर्चात पूर्ण ताकदीने सामील व्हावे असे आवाहन नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, एकनाथ गिर्हे, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!