संयुक्त किसान मोर्चातर्फे प्रजासत्ताक दिनी हरियाणात महापंचायत, देशभर ट्रॅक्टर मार्च !

आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये आंदोलने

 

प्रतिनिधी —

२६ जानेवारी २०२३ रोजी, भारताच्या प्रजासत्ताक दिनी, जिंद, हरियाणा येथे संयुक्त किसान मोर्चातर्फे (एसकेएम) आयोजित केलेल्या विशाल महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. इतर सर्व किसान संघटनांसोबत अखिल भारतीय किसान सभेच्या हरियाणा आणि पंजाब राज्यांचा त्यात चांगला सहभाग होता.

दोन वर्षांपूर्वी २६ जानेवारी २०२१ रोजी, ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचे दोन महिने पूर्ण झाले असताना, दिल्लीच्या सीमांवर १ लाख ट्रॅक्टर्सवर ५ लाख स्त्री-पुरुष शेतकऱ्यांची विशाल परेड काढण्यात आली. त्याच दिवशी मोदी-शहा सरकारच्या कारस्थानाने लाल किल्ल्याच्या हिंसाचाराची घटना घडली, आणि तिचा वापर करून सरकारने शेतकरी आंदोलनावर प्रचंड दडपशाहीचा वरवंटा फिरविला. पण या आंदोलनाने त्याचाही पुढील काही महिने जबरदस्त सामना केला, आणि वर्षभर सुरू असलेल्या या अभूतपूर्व आंदोलनाने धर्मांध व कॉर्पोरेटधार्जिण्या भाजप सरकारवर मात करून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडले.

कालच्या जिंदच्या महापंचायतीत मोदी-प्रणित भाजप सरकारच्या ‘वादाखिलाफीचा’ (विश्वासघाताचा) तीव्र निषेध करण्यात आला आणि किफायतशीर आधारभावाची कायदेशीर हमी, शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती व त्यांना वाढीव पेन्शन, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करणे, पीक विमा योजनेत आमूलाग्र शेतकरीधार्जिणे बदल, या शेतकऱ्यांच्या उर्वरित ज्वलंत मागण्यांसाठी देशभर आंदोलन जास्त तीव्र करण्याची हाक देण्यात आली.

काल संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेनुसार देशभर जिल्हा स्तरावर ट्रॅक्टर मार्च काढण्यात आले, व त्यात लाखो शेतकऱ्यांनी भाग घेतला.

महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चात असलेल्या संघटनांची ऑनलाइन बैठक होऊन त्यात ठरल्यानुसार २५ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा व तालुका पातळ्यांवर ट्रॅक्टर मोर्चे, मोर्चे व निदर्शने यशस्वी झाली. त्यात हजारों शेतकऱ्यांनी भाग घेतला. राष्ट्रीय प्रश्नांसोबत महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीची नुकसानभरपाई, पीक विमा भरपाई, शेतमालाला रास्त भाव, उर्वरित कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, जमिनीच्या हक्काचे इतर प्रश्न हे राज्यातील व स्थानिक प्रश्न सुद्धा २५ जानेवारीच्या कृतींत घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे २१ हून अधिक जिल्ह्यांत हे मोर्चे-निदर्शने यशस्वी झाले असल्याची माहिती डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले यांनी दिली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!