संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा विरोध !

 

 मुलाबाळांसह महिलांचा ग्रामपंचायत मध्ये ठिय्या आंदोलनाचा इशारा !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील ग्रामपंचायत प्रशासनाने देशी दारू दुकानास परवानगी दिली असल्याने गावातील तरुण चांगलेच आक्रमक झाले. तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येत घोषणा देत या दारू दुकानात विरोध दर्शविला व हे सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयात गेले. आक्रमक झालेल्या तरुणांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामविकास अधिकारी यांना जाब विचारला असता ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनीच त्या विषयाला संमती दिली असल्यामुळेच परवानगी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी  झाली.

संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे गावाच्या पूर्वेला कोल्हार घोटी राज्य मार्गा वर देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली असल्याचे देवा शरमाळे यांना समजले. त्यांनी गावातील तरुणांना व महिलांना एकत्र करून ग्रामपंचायती मध्ये जाऊन ग्रामविकास अधिकारी यांना धारेवर धरत गावात तुम्ही देशी दारूच्या दुकानाला कुणाच्या सांगण्यावरून परवानगी दिली याचे आम्हाला उत्तर द्या अशी आक्रमक भूमिका घेतली.

देवा शरमाळे, बापू दळवी, मोहसीन शेख, रियाज शेख, शिवाजी शरमाळे, इरफान पठाण, अशोक चांडे, साजिद शेख, भागवत शरमाळे, विठ्ठल शरमाळे याच्या सह तरुण व महिला या वेळी उपस्थित होते. ग्रामसभेत सरपंच व इतर सदस्यां समोर हा विषय घेण्यात आला त्यानंतर त्यास ग्रामसभेत सर्वांनीच परवानगीदिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी नागरे यांनी सांगितले.

आम्हाला दारू नको पाणी हवे अशी घोषणा या वेळी देण्यात आली. ग्रामपंचायतीने आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर ठराव केलेले आहेत. हे ठराव रद्द करण्यात यावेत. गावात कुठल्याही प्रकारचे दारूचे दुकान आम्ही सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी या वेळी घेतला. जर गावामध्ये देशी दारूचे दुकान सुरू झाले तर आम्ही बायका मुलाबाळांसह महिला ग्रामपंचायती समोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!