लोकशाही व्यवस्थेमुळे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही प्रतिमा जगात निर्माण झाली — पालकमंत्री विखे पाटील
प्रतिनिधी —
संविधानाच्या माध्यमातून देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखले गेले आहे. लोकशाही व्यवस्थेतून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही प्रतिमा जगात निर्माण करण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम महसूल, पशुसंर्वधन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

विखे पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानातून आपल्याला लोकशाही व्यवस्थेची मूल्य मिळाली. यामुळे प्रत्येक नागरीकांना विचारांचे स्वातंत्र्य मिळाल्याने लोकशाहीची व्यवस्था अधिक भक्कम झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. यातूनच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही देशाची ओळख जगात निर्माण होण्यास मोठी मदत झाली असल्याकडे लक्ष वेधत देशातील युवा शक्तीला मोठ्या संधी निर्माण झाल्या असल्याचे स्पष्ट करून स्टार्टअप योजनेमुळे हे शक्य झाले असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

यावेळी विखे पाटील यांनी परेडचे निरिक्षण केले. परेडमध्ये पोलिस दल, महिला पोलिस दल, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, वैद्यकीय पथक यांच्यासह विविध चित्र रथांचा समावेश होता. रेसिडेन्सिअल हायस्कुल, चक्रधर स्वामी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव, रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कुल, भाऊसाहेब फिरोदीया हायस्कुल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांवर सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरीक याप्रसंगी उपस्थित होते.

