‘मालपाणी’ दिल्याशिवाय फाईलच हलत नाही — गडकरी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
सध्याच्या सिस्टीममध्ये परवानग्या मिळायला वेळ लागतो. त्याला लोक कंटाळून जातात.’मालपाणी’ दिल्याशिवाय फाईलच हलत नाही. अशा शब्दात केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्य सरकारच्या मंत्र्यांचे कान टोचले.
वरळी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया मध्ये आयोजित मराठी तितुका मेळवावा या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र व मुंबईचे देशाच्या विकासातील योगदान, उद्योग, नोकरी उद्योग, इथेनॉल, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, साखर उद्योग, फ्लाय ओव्हर अशा विषयांवर भाष्य केले.
या संमेलनात भाषण करताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जगभरातील मराठी उद्योजकांचे
महाराष्ट्रात विशेष स्वागत आहे. त्यांना नेहमीच रेड कार्पेट वागणूक दिली जाईल असे विधान केले होते. उद्योग मंत्र्यांच्या या विधानाचा धागा पकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री व व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे कान टोचले.

गडकरी म्हणाले, माझी उदय सामंत व दीपक केसरकर यांना विनंती आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामाची वेळ मर्यादा ठेवली आहे. वेळ ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पण सिस्टीम मध्ये इतका वेळ लागतो प्रत्येक माणूस त्रस्त होतो त्याला लोक कंटाळून जातात. पण ते बोलत नाहीत ‘मालपाणी’ दिल्याशिवाय फाईलच हलत नाही. असा टोला राज्य सरकारच्या मंत्र्यांना हाणला.

गडकरी यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. ही गोष्ट गडकरी यांच्या लक्षात आल्यावर ‘म्हणजे मी केवळ महाराष्ट्राबद्दल बोलत नाही. अशी सारवासारव त्यांनी केली.

शिवसेनाप्रमुखांची आठवण
यावेळी नितीन गडकरी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी ॲक्रॅलिकच्या शिटवर मला एक वाक्य लिहून दिले होते. त्यावर ‘आय लाईक पीपल हू गेट द थिंक्स् डन’. हे वाक्य मला खूप आवडले होते. याचा अर्थ काम झाले पाहिजे, करायचे असेल तर हो म्हण, नसेल करायचे तर वेळ नको घालवू. बघतो पाहातो, हा धंदा नको. असे गडकरी यांनी सांगताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सौजन्य दैनिक सामना

