गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली दहशत आणि दडपशाहीचे राजकारण ! 

विकासकामे ठप्प ! निळवंडेही रखडले !!

माजी मंत्री आमदार थोरात यांचा गंभीर आरोप  

प्रतिनिधी —

गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली जिल्ह्यात राजकारण सुरू असून दहशत आणि दडपशाहीचे राजकारण जिल्ह्याला मान्य होणार नाही. असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

आमदार थोरात यांच्या वतीने त्यांच्या यशोधन संपर्क कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे त्यात वरील गंभीर आरोप केला आहे.

दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवीन पद्धत अहमदनगर जिल्ह्यात राबविली जात आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ‘काही मंडळींच्या‘ व्यक्तिगत हट्टा पायी मंजूर झालेली विकास कामे थांबविली जात आहे. गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली जिल्ह्यात राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला अहमदनगर जिल्ह्याचा एवढा राग का आहे? सत्तेत असूनही जिल्ह्याच्या हिताच्या आड येणारी ही मंडळी जिल्ह्याचे खरे विरोधक आहेत, अशी भावनाही थोरात यांनी बोलून दाखविली.

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळातही, राज्याच्या विकासाला गतिमान ठेवले होते. जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रकल्प आणि योजनांना मंजुरी दिली होती. नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने अनेक महत्त्वकांक्षी योजनांना स्थगिती दिली. काही मंडळींनी त्याही पुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकास कामांना स्थगिती दिली.

अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे सुरू होती. आज ती कामेही ठप्प झाली आहेत. वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली राजकीय कारवाया केल्या जात आहे. कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करून उद्योग व्यवसायिकांना वेठीस धरले जात आहे.

या बेकायदेशीर कारवाई मुळे घरांची, रस्त्यांची व सरकारी विकास कामे सुद्धा बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून अनेक कामगारांना उपाशी पोटी झोपावे लागत आहे.

उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला निळवंडे प्रकल्प आज रखडलेला आहे. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला गती दिली होती, अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी संघर्ष सुरू आहे. हा प्रकल्प रखडविण्यासाठी आणि दुष्काळी भागाला पाणी मिळू नये म्हणून तर हे षड़यंत्र नाही ना, अशी शंका येऊन जाते.

अहमदनगर जिल्हा हा समृद्ध राजकीय परंपरा असलेला जिल्हा आहे. सत्ताधाऱ्यांकडून सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कारवाया या येथील परंपरेला छेद देणाऱ्या आहे. राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण जिल्हाच काही मंडळींनी वेठीस धरला आहे. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे सोडून, आहे ती विकासकामे थांबविण्यात काहीही अर्थ नाही, असेही थोरात म्हणाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!