संगमनेर तालुक्यात अवैध ट्रॅक्टर ट्रॉल्यांमधून धोकादायक ऊस वाहतूक !
साखर कारखाना, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांचे दुर्लक्ष !
गोड उसाच्या वाहतुकीची कडू कहानी !!
भाग १
विशेष प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी ऊस वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. ही ऊस वाहतूक करताना अवैध ट्रॅक्टर ट्रॉल्यां मधून बेकायदेशीर पद्धतीने ऊस वाहतूक केली जात असून या वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र संबंधित साखर कारखाने, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी अशा अवैध वाहतुकीकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.

सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. संगमनेर तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. तर शेजारीच अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना आहे. या तीनही साखर कारखान्यांच्या गळीता साठी लागणारा ऊस संगमनेर तालुक्यातून आणि आसपासच्या तालुक्यातून कारखान्यांकडे ये जा करण्याकरता, नेण्याकरता ट्रॅक्टर ट्रॉल्या, बैलगाडी, ट्रक याचा वापर होत आहे.

(संगमनेर तालुक्यात महामार्गावरून अशा प्रकारे ऊस वाहतूक होत आहे. छायाचित्र – अण्णासाहेब काळे, संगमनेर)
मात्र यामध्ये वापरले जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉल्या बहुतांश अवैध बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे, नागरिकांच्या जीवितास धोका आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता ट्रॅक्टर ट्रॉल्यांमधून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक होत आहे. अरुंद रस्त्यावर तर या ट्रॅक्टर ट्रॉल्यांपासून अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे. एका ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉल्या जोडून आणि ट्रॅक्टर ट्रॉल्यांची लांबच लांब रांग करून रस्त्यावर अडथळे निर्माण केले जात आहेत. तसेच या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कुठल्याही प्रकारे वाहतूक नियमाप्रमाणे बनवलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या शक्यता अधिक वाढल्या आहेत. अशा ट्रॉल्या वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्या कायदेशीर नाहीत.

ट्रॅक्टर मधून ऊस वाहतूक करणारे चालक ट्रॅक्टर मध्ये मोठे मोठे लाऊड स्पीकर्स लावून, डेसिबल चे नियम मोडत, मोठ्या आवाजात गाणे आणि संगीत लावत ऊस वाहतूक करताना जागोजागी दिसून येत आहेत. ट्रॅक्टरच्या इंजिनचा आवाज त्यात या लाऊड स्पीकरचा कर्ण कर्कश्य आवाज यामुळे या चालकाला आजूबाजूंनी येणारे आवाज, तसेच पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा आवाज ऐकण्यास मिळत नाही. त्यामुळे सुद्धा अपघाताचा धोका होऊ शकतो. मात्र याकडे सर्वच विभागांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

या लाऊड स्पीकरच्या आवाजांचा त्रास रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी अधिक होत असतो. ज्या ठिकाणी ऊसतोड चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा ट्रॉल्या उसाने भरेपर्यंत मोठमोठ्या आवाजात गाणे वाजवले जातात. ज्या ज्या भागातून हे ट्रॅक्टर्स वाहतूक करतात त्या त्या भागातील ग्रामस्थांना, नागरिकांना या मोठ्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.

चालक रस्त्याच्या अगदी मध्यभागातून ट्रॅक्टर भरधाव पळविताना दिसतात. त्यामुळे अरूंद रस्त्यावरून दुसऱ्या वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ता राहत नाही. तर रूंद मार्ग व महामार्गावर हे ट्रॅक्टर सुसाट धावत असून, वाहतूक नियमांची पायमल्ली सुरू आहे.

उसाची गळीत हंगामासाठी तोडणी सुरू आहे. तोडणी केलेले ऊस ट्रॉलीतून भरून ट्रॅक्टरने साखर कारखान्यात पाठविला जात आहे. एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉलीची जोडणी करून उसाची वाहतुक सुरू आहे. चालक रस्त्याच्या अगदी मध्यभागातून ट्रॅक्टर भरधाव पळविताना दिसतात. त्यामुळे अरूंद रस्त्यावरून दुसऱ्या वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ता राहत नाही. चढाला लागल्यानंतर हे ट्रॅक्टर अधिक धोकादायक ठरत आहेत. ओव्हरलोडमुळे गती मंदावत असल्याने नागमोडी वळणाने चालक चढ चढत आहेत. इतर वाहनचालकांसाठी ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने दखल न घेताच अहोरात्र हे ट्रॅक्टर धावत आहेत. रस्त्यावरून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची दिवसभर वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी अनेक चालक एकाच हेडलाइटचा वापर करतात. एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या व एकच हेडलाईट अशा प्रकारामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांची फसगत होते. ट्रॉलीला मागील बाजूने लाइट नसतो. फक्त रिफ्लेक्टरवरूनच मागील वाहनांना अंदाज घ्यावा लागत आहे.

चालक मद्यप्राशन करून साउंड सिस्टीमचा आवाज वाढवून ट्रॅक्टर दामटतात. त्यामुळे हे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर इतर वाहनचालकांच्या जिवावर उठल्याची स्थिती आहे. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उसाची वाहतूक होते. रस्ता नागमोडी, उताराचा व चढावाचा असल्यास अपघाताचा धोका वाढतो. असे अपघात झाल्याच्या घटना इतरत्र घडलेल्या आहेत.
(क्रमशः)

