कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे गौण खनिज तस्करांबरोबर असलेल्या “स्नेहपूर्ण संबंधांचे बिंग फुटले !
गौण खनिज तस्करीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्यावर प्रांतांचे कारवाईचे आदेश !
प्रतिनिधी —
संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी गौण खनिज तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यास सांगूनही टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संगमनेर विभागातील महसूल कर्मचारी ते अधिकारी तस्करी करणाऱ्या तस्करांशी, वाळू सम्राटांशी कसे गुप्त हितसंबंध आहेत याचे ‘बिंग’ फुटले असून आता थेट प्रांत अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावण्यची “डेअरिंग” कर्मचाऱ्यांमध्ये आल्याचे या घटनेने दिसून आले आहे. आता संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील वाळू तस्कर आणि महसूल विभागातील सर्वसामान्य कर्मचारी थेट अधिकारी यांच्यातील ‘लागेबांधे’ आणि स्नेहपूर्ण संबंधांची चर्चा तालुक्यात होत होती.आता या घटनेमुळे णि प्रांताधिकार्यांच्या कारवाईच्या घटनेमुळे त्यावर शिक्का मोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडलेल्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली म्हणून तालुक्यातील धांदरफळ या ठिकाणी जाण्यास सांगितलेल्या तलाठी मुळे यांच्यावर प्रशासकीय कर्तव्यात कसूर याबाबत कारवाई करावी असे आदेश संगमनेरचे प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी तहसीलदार यांना दिले आहेत.

साहेबराव वलवे हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक आणि खास कार्यकर्ते आहेत. महसूलमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून अशी वागणूक मिळत असेल तर संगमनेरचे महसूल खाते आणि वाळू तस्करांमध्ये मुरत असलेले संबंध या घटनेमुळे उघडे पडत चालले आहेत.
त्यामुळे संगमनेर तालुक्यात असलेल्या सर्वच महसूल कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. कर्मचारी बदलून नवे कर्मचारी आणून जुन्या कर्मचाऱ्यांचे, महसूल अधिकाऱ्यांचे वाळू तस्करी करणाऱ्यांचे आणि गोण खनिज लुटमार करणाऱ्यांचे हितसंबंध पूर्णपणे उकडून टाकावेत अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे यांनी वाळू तस्करी करणारा एक मोठा ट्रक अडवला होता. यामध्ये वाळू तस्करी केली जात होती. प्रांताधिकारी यांना विनंती करून हा ट्रक ताब्यात घ्यावा व चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली होती.
प्रांताधिकारी यांनी सदर तलाठ्याला घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे वारंवार सांगितले तरीही कारवाई करण्यास सदर तलाठ्याने टाळाटाळ केल्यामुळे प्रांताधिकारी यांनी थेट या तलाठ्यावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

सदर तलाठ्याच्या विरुद्ध तक्रार आली असून प्रांत अधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल असे तहसीलदारांनी म्हटले आहे.
एकंदरीत पाहता संगमनेर तालुक्यातील गौण खनिज व वाळू तस्करी आणि या मुळे मुजोरपणा आलेले वाळू तस्कर व महसूल विभागातील कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचे सदभावनेचे संबंध उघड झाले आहेत. या घटनेमुळे हे चव्हाट्यावर आले आहे.

वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा तलाठी कारवाई करत नसतील तर या सर्वांचेच एकमेकांशी किती स्नेहपूर्ण संबंध आहेत हे दिसून आले आहे.
ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे यांनी धांदरफळ येथे रात्रीच्या वेळी एका मोठ्या डंपर मधून गौण खनिज तस्करी होत असल्याचे पाहिले. त्यांनी सदर ट्रक थांबवून पाहणी केली असता यामध्ये गौण खनिज वाळूची तस्करी होत असल्याचे त्यांना दिसून आले.

संगमनेरचे प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांना त्यांनी फोनवरून सर्व माहिती दिली. प्रांत अधिकारी यांनी संबंधित तलाठी मुळे यांना घटनास्थळी जाऊन, परिस्थिती पाहून संबंधित तस्करी करणाऱ्या ट्रकवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले.
सुमारे दोन ते अडीच तास वाट पाहून देखील सुद्धा हे तलाठी महाशय कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेले नाहीत. तसेच साहेबराव वलवे यांनी फोन करून देखील त्यांनी तेथे येण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तर वलवे यांचे फोन घेणेच टाळले आणि त्या वाळू तस्करावर कुठलीच कारवाई केली नाही.

म्हणून संतप्त झालेल्या वलवे यांनी थेट प्रांताधिकारी यांच्याकडे या तलाठ्याविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार केली. तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात देखील संबंधित तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्यात धमकी दिल्याची तक्रार केली आहे.
साहेबराव वलवे यांनी पोलीस आणि प्रांताधिकार्यांकडे तक्रार केल्याने आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्यावर काय कारवाई होती याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. घटना घडून चार दिवस झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांना सोपवणार आहेत.


