राजहंस दूध संघात वसुबारस उत्साहात संपन्न
शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व — रणजितसिंह देशमुख
प्रतिनिधी —
गोमातेपासून दूध मिळते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा दुग्ध व्यवसायावर चालतो. वसुबारसला गोमातेचे पूजन करणे ही आपली परंपरा व संस्कृती आहे. जसा बैलपोळा साजरा होतो तशीच संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात नेहमी वसुबारस साजरी होते. मात्र यावर्षी लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या पशुधनाचे काळजी घ्यावी. पशुधनाचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ संगमनेर संघामध्ये चेअरमन रणजितसिंह देशमुख हस्ते गाय पूजन करून वसूबारस साजरा करण्यात आली. यावेळी संघाचे व्हॉईस चेअरमन राजेंद्र चकोर , संचालक विलास कवडे, संतोष मांडेकर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी , फायनान्स मॅनेजर गणपत शिंदे, संकलन प्रमुख भाऊसाहेब आहेर, सुनिल राऊत आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वसुबारस निमित्त मागील अनेक वर्षापासून संगमनेर तालुक्यात गो पूजन करून मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा होत असतो. मात्र यावर्षी लम्पी आजाराचा प्रादुर्भाव असल्याने सर्वांनी पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. गोठ्यांची स्वच्छता, गोचीड निर्मूलन, गायींची स्वच्छता, जंत निर्मूलन ही काळजी प्रत्येकाने घेऊन पशुधनास सकस आहार दिला पाहिजे.

राजहंस दूध संघाच्या वतीने गाईंच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून तालुक्यात बैलपोळ्याप्रमाणे मोठ्या उत्साहात गायपोळा अर्थात वसुबारस साजरी होत असते. ही संस्कृती इतरांसाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारे यांनी केले. तर व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

