राजहंस दूध संघाकडून ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग – रणजितसिंह देशमुख
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संघाच्या वतीने दीपावलीनिमित्त दूध फरक, दुधाचे पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट व अनामत, कामगारांचा बोनस आणि मेहनताना पगार असे एकूण ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.

दीपावली निमित्त वर्ग केलेल्या पेमेंट बाबत माहिती देताना चेअरमन रणजित सिंह देशमुख म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करत लौकिकास्पद वाटचाल केली आहे. दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. सरासरी ३५ रुपये भाव, दूध संघाची रिबेट व स्थानिक संस्थांचे रिबिट म्हणून दूध उत्पादकास सर्वाधिक भाव राजहंस दूध संघाकडून मिळत असतो .दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ पासून एक रुपया दूध दरवाढ करण्यात आली असून आता ३६ रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणार आहे. याचबरोबर मागील वर्षी साठी प्रति लिटर एक रुपया रिबीट देण्यात आले आहे.

राजहंस दूध संघाच्या वतीने अत्यंत अडचणीच्या कोरोना काळात एकही दिवस बंद न घेता दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. याचबरोबर गाईंच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. नुकत्याच आलेल्या लंम्पी आजारात सर्वत्र मोफत लसीकरण संघामार्फत करण्यात आले आहेत. याचबरोबर हर्डमन, राजहंस प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर या मार्फत विविध योजना राबवल्या जात असून संघामार्फत मूरघास, सामूहिक जंत व गोचीड निर्मलन, कावीळ लसीकरण, मॉडर्न डेअरी फार्म, राजहंस मिनरल मिक्स्चर , पशुखाद्य इत्यादींसाठी काही प्रमाणात अनुदान दिले जात आहे.

तसेच मुक्त संचार गोठा, मॉडर्न डेअरी या योजना राबविण्यात येत आहेत. लंपीच्या आजारावर औषधे १०० टक्के अनुदानावर दूध संघाने पुरवली आहेत. तसेच उच्च वंशावळ असणाऱ्या गाई तयार करण्यासाठी उच्च प्रतीचे सिमेंस गाय उत्पादकांना पुरविण्यात आले आहे.

दूध संघाने सातत्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून या दिपावली निमित्त दूध संघाकडून सुमारे ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे .यामुळे दूध उत्पादक, दूध वाहतूक, ठेकेदार ,कामगार व शहरातील व्यापारी वर्गामध्ये ही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दीपावलीनिमित्त दूध उत्पादक , कामगार यांना रिबेट व बोनस देण्याची परंपरा राखत ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केल्याबद्दल दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक आर.बी. राहणे, लक्ष्मणराव कुटे, भास्कर सिनारे, विलास वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी, जनरल मॅनेजर गणपत शिंदे यांचे दूध उत्पादन दूध उत्पादकांनी अभिनंदन केले आहे.

