अगस्ती कारखाना कर्जमुक्त करा, शेतकऱ्यांना चांगला भाव द्या — अजित पवार
मागील सत्याधार्यांच्या उधळपट्टीवर प्रश्नचिन्ह !
प्रतिनिधी —
२९ वर्षे एवढा एका पिढीचा कार्यकाल अगस्ती कारखान्यात झालेला आहे. तरीही कारखान्यावर कर्जाचा बोजा आहे. कर्ज वेळेवर फेडले गेलेले नाही. कर्ज वेळेवर फेडले तरच कारखाना व्यवस्थित चालू शकतो. ऋण काढून सण साजरे करायचे नाही, कर्जबाजारी होऊन भाव द्यायचा नाही. कारखाना कर्जमुक्त कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्यात हा कारखाना अकोले तालुक्याच्या सर्व जनतेसाठी भाग्याचा कारखाना ठरावा म्हणून सगळ्यांनी कारखाना काटकसरीने चालवून कर्जमुक्त कसा होईल आणि चांगला भाव कसा देईल याकडे लक्ष द्यायला हवे. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या २९ वा ऊस गळीत हंगाम व आसवणी प्रकल्प शुभारंभ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते व आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात चालू हंगामातही साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. केंद्र सरकारने साखरेचा निर्यात कोटा बंधने लादू नयेत. राज्य सरकारने यासाठी केद्रातील मंत्र्यांना भेटून मागणी करावी अशी अपेक्षा व्यक्त करत, अगस्ती कारखान्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काटकसरीने कामकाज करताना एकत्रित पणे खर्च कमी करण्याचे धोरण व सभासदांचे हित पाहा. कर्मचारी व शेतकरी ही कारखान्याची दोन चाके आहेत त्यांचा समन्वय करुन अगस्ती कारखान्याचा नगर जिल्ह्यात एक नंबरचा भाव कसा देता येईल याचा प्रयत्न करा व येत्या काही काळात अगस्ती कर्जमुक्त होऊन स्वयंपूर्ण झाला अशी ओळख निर्माण करा.

यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अँड. माधवराव कानवडे, संचालक प्रशांत गायकवाड, उत्तर नगर शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे, अगस्तीचे अध्यक्ष सिताराम गायकर, व्हा.चेअरमन अशोक भांगरे, कपिल पवार, संदिप वर्पे, प्रकाश मालुंजकर, कारभारी उगले, मधुकर नवले, डॉ.अजित नवले, विजय वाकचौरे, अमित भांगरे, मारुती मेंगाळ, भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, सुरेश गडाख, रामहरी तिकांडे, शरद देशमुख, सुशांत आरोटे, भाऊपाटील नवले व्यासपीठावर उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, मला वयाच्या २४ वर्षापासून कारखान्याचा संचालकाचा अनुभव आहे. मी सहकारी संस्थाचा पाठीराखा, समर्थक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कारखान्यांना मदतीचे धोरण राज्यात घेतले होते.
आता कारखान्यात स्पर्धा वाढली आहे. सिरप ते इथेनॅाल उत्पादन सुरु झाले.अगस्तीने ३० हजार डिस्टलरी मध्ये आर/एस व बी हेव्हि उत्पादन घेतले पाहिजे. जेवढी ऊसातुन साखर जास्त निघेल तेवढी रिकव्हरी जास्त व एफ.आर.पी.ही जास्त मिळते.

मला या ठिकाणी माहिती मिळाली की, अगस्तीच्या पूर्वीच्या चेअरमनच्या घरी कारखान्याचे ३८ कर्मचारी काम करत होते हे कळाले हे चुकीचे आहे. आम्ही इतके वर्ष सहकार, राजकारण क्षेत्रात काम करतो माझ्या घरी एकही कर्मचारी कारखान्याचा कामगार नाही. असेही अजित पवार म्हणाले.

अनेकदा संचालक निवडून आले कि राज्यातील सर्व देवदर्शन तसेच राज्याबाहेर वैष्षवदेवीलाही कारखान्याच्या पैशातून फिरतात. हे घडता कामा नये. अगस्ती कारखान्याच्या कामगारांच्या पगाराचा खर्च, ऊस तोडीचा खर्च, व्याजाचा खर्च इतर कारखान्यांपेक्षा जास्त आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत असलेली ही तफावत योग्य नाही. असे म्हणत कारखान्याच्या मागील कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले.

एफआरपी तुलनेत जास्त भाव दिल्याने कर्ज वाढले, कर्मचारी, अधिकारी पगार/ वेतनावरील अधिकचा खर्च. प्रति टन साखरेचा उत्पादन खर्च जास्त आहे. मोलॅशिस, स्टिलस्टॅन्ड व इतर साठी घेतलेले कर्ज इतर ठिकाणी वापरले गेले.९२-९३ पासून सुरु असलेला कारखाना ३५०० टन प्रति दिन गाळप क्षमता आहे. अशा अनेक त्रुटी त्यानी निर्देशित केल्या.

कारखान्यात सभासदांना भाव द्यायचा तर केवळ साखर उत्पादन करुन नुसते दळायचे नाही. तर को-जन, इथेनॅाल आदि इतर उत्पादने घेतली पाहिजेत. कारखाना चालवणे येड्या गबाळ्याचे काम नाही. अगस्तीत २९ वर्षात एक पिढी झाली. तरी कर्जाचा बोजा आहे. कर्ज घेतल्यानंतर ५ ते ७ वर्षात फेडले पाहिजे. ऋणातून सण साजरा करण्यासारखे कर्ज काढून भाव द्यायचा नसतो. येत्या काळात कारखान्यात काटकसरीने काम करुन कर्जमुक्त करा व शेतकऱ्यांना चांगला भाव द्या. असे सांगून अनेक माैलिक सुचना पवार यांनी केल्या.

आमदार डॉ. किरण लहामटे, सिताराम गायकर यांची भाषणे झाले. कैलास वाकचौरे, मिनानाथ पांडे, परबत नाईकवाडी,अशोक आरोटे, अशोक देशमुख, रामनाथ बापू वाकचौरे, यमाजी लहामटे, मच्छीन्द्र धुमाळ, कैलास शेळके, पाटीलबुवा सावंत, विक्रम नवले, प्रदीप हासे, विकास शेटे, मनोज देशमुख, सचिन दराडे, बादशहा बोंबले, सुलोचना नवले, शांताबाई वाकचौरे, बाळासाहेब ताजणे, प्रताप देशमुख, आर.डी.चाैधरी, शांताराम संगारे,
सभासद, शेतकरी, कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, केन मॅनेजर सयाजी पोखरकर, शेतकी अधिकारी सतीश देशमुख आदींसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, कामगार व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

