थोरात साखर कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर
प्रतिनिधी —
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सालाबादप्रमाणे दिपावली निमित्त मोफत १५ किलो साखर वाटप करण्यात येणार असून सोमवार दि १७ ऑक्टोंबर ते गुरुवार २० ऑक्टोंबर या काळात कारखाना कार्यस्थळावर साखर वाटप केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. ३०/०९/२०२२ अखेर मंजुर प्रतिशेअर्सला १५ किलो साखर देण्याचे ठरविले आहे. ज्या सभासदांना कारखान्याने ओळखपत्र दिलेले आहे. त्यांनी सदर ओळखपत्र सोबत आणावे. त्यांना थेट गोडाऊन नंबर १३ मधून ओळखपत्राच्या नोंदीवर साखर देण्यात येईल.

सभासद ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतीवर साखर दिली जाणार नाही. कारखान्याने दिलेले ओरीजनल ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच जे सभासद ओळखपत्र घेऊन येणार नाहीत अशा सभासदांना सभासद ओळखपत्र असल्याशिवाय साखर दिली जाणार नाही.

जे सभासद बाहेरगावी राहतात व त्यांचे ओळखपत्र तयार झालेले नाही अशा सभासदांनी साखर घेणेसाठी येताना एक फोटो व आधारकार्ड कॉम्प्युटर विभागाकडे जमा केल्याशिवाय साखर मिळणार नाही. स्वत: येऊ न शकणाऱ्या सभासदांनी सभासदाचा फोटो, आधारकार्ड व सोसायटी किंवा ग्रांमपंचायत यांचे सही व शिक्का असलेले अधिकारपत्र देवून दिलेल्या वेळेत साखर घ्यावयाची आहे. साखर वाटप कार्यक्रमानंतर असे अधिकारपत्र स्विकारले जाणार नाहीत. निव्वळ अधिकारपत्रावर साखर दिली जाणार नाही.

तसेच सभासदाने स्वत: शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे. सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व सभासद बंधू भगिनींनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबद सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअमरन संतोष हासे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

