संगमनेर शहरातील नियमबाह्य रुग्णालयात रुग्णांची लूट !
रुग्णालयांची बांधकामे बेकायदेशीर ; राष्ट्रीय छावा संघटनेचे उपोषण सुरू
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील बहुतांश रुग्णालयांमधून अव्वाच्या सव्वा बिले देऊन रुग्णांची लुटमार केली जाते. तसेच शहरात बांधण्यात आलेली अनेक रुग्णालये ही नियमबाह्य असून त्यांची बांधकामे बेकायदेशीर आहेत. परवान्यानुसार बांधकामे नसलेल्या रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी करत राष्ट्रीय छावा संघटनेने नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. तसेच संगमनेर शहरातल्या बऱ्याच रुग्णालयांच्या अवैध बाबी संघटनेने उघडकीस आणल्या आहेत.

संगमनेर शहरातील बहुतांश हॉस्पिटलमधून रुग्णाना मोठमोठी बिले देवून रुग्णांची लुटमार केली जाते. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह एनएबीएच व हेल्थकेअर मान्यताप्राप्त इन्शुरन्स पॉलिसींच्या सुविधांचा लाभ घेतला जात असून यात कुठल्याही प्रकारच्या निकषांमध्ये हॉस्पिटल बसत नसल्याने रुग्णांच्या नावाखाली हॉस्पिटल व डॉक्टर या योजनांचे व्यक्तिगत लाभ घेवून शासनाला फसवत आहेत.

बहुतांश रुग्णालयांनी बांधकाम परवानगी प्रमाणे रुग्णालयाचे बांधकाम केलेले नाही. तसेच काही विनापरवानगी बेकायदेशीरपणे चालत असलेल्या हॉस्पीटलवरनगरपालिकेने त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष प्रविण कानवडे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले आहे. संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णालये असून किती अनाधिकृत, आधिकृत पद्धतीचे आहेत ? परवानगी क्लिनिक साठी जागेवर मात्र हॉस्पिटल असा प्रकार आहे. याची माहिती नगरपालिकेकडे नाही. प्रत्यक्षात मात्र यादीच उपलब्ध नसल्याने मालिकेचा ढिसाळ कारभार दिसून येतो.

मोठया इमारतीयुक्त रुग्णालये संगमनेर शहरात असून मंजूर बेड संख्या व प्रत्यक्षात असणारे बेड जास्त आहेत. त्यात नेहमीच तफावत असते. ना हरकत दाखला व हॉस्पिटल परवानगी देताना उपलब्ध असणारी साधनसामग्री तपासणी करणे ही जबाबदारी संगमनेर नगरपालिकेचे आहे. तर हॉस्पिटलची सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची आहे.परंतु संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे स्वतःचेच हॉस्पिटल असल्याने त्यांचा पूर्ण वेळ तिकडे जातो.

जे ग्रामीण रुग्णालयात कधीच उपलब्ध नसतात ते तपासणी कसे करणार ? त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक मिळावा अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांची हॉस्पीटल मधून लुट झाल्याचे चित्र दिसले. ग्रामिण भागातील सर्व सामान्य माणुस आजारपणात शहराकडे धाव घेतो. मात्र येथे येवून या ना त्या आजारातून भीती निर्माण करत त्यांची लुट करतात. एक दोन वर्षातचं एखादया डॉक्टरचे भव्य इमारत उभी राहते. त्यातून सर्व सुविधा नुसार हॉस्पीटल असल्याची प्रसिद्धी केली जाते. मात्र रुग्णांची लुटमार होताना दिसत आहे . शहरामधील असणाऱ्या हॉस्पीटलची संगमनेर नगरपालिकेकडे सादर केलेले व मंजूर रेखांकन प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर वेगळेच बांधकाम दिसून येत आहे. संगमनेर नगरपालिकेकडे अश्या ३५ ते ४० हॉस्पिटल्सची माहिती आहे. परंतु अद्याप देखील हॉस्पिटलवर कुठलीही कारवाई झालेली नाही. बांधकाम इमारतीच्या सर्व बाजूने कुठली जागा सोडली नसून रुग्णवाहिका जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा नसल्याचे दिसून येते.

नकाशावर पार्किंग दाखवले मात्र प्रत्यक्षात पार्किंग नसल्याने शहरांमध्ये ट्राफिक ची समस्या रोजचे झाले आहे. वाढीव बांधकाम, अनधिकृत बांधकाम, नियमाप्रमाणे बांधकाम न करणे याबाबत संगमनेर नगरपालिका कारवाई करताना सर्वसामान्य जनतेला एक न्याय हॉस्पिटल यांना एक न्याय हा पक्षपातीपणा नगरपालिकाकडून चालू असल्याचे निदर्शनात येत आहे.

हॉस्पीटल मध्ये पुरेश्या सुविधा नसून किरकोळ आजारातून विविध तपासण्याकरिता चिठ्ठ्या देवून भरमसाठ पैसा उकळला जात आहे. नगरपालिकेकडे हॉस्पीटलच्या बांधकामासह पार्किग, बेड, कर्मचारी, मशिनरी, याची संपूर्णं माहीती असायला हवी ती माहीती सध्यातरी पुरेशी नसल्याचे दिसून येत आहे. असे वरील सर्व आरोप प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केले आहेत.

अनाधिकृत व अधिकृत यांचा ताळमेळच दिसत नसल्याने नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी. अन्यथा हे उपोषण असेच सुरू राहील असा इशारा प्रविण कानवडे यांनी दिला आहे.
या उपोषणात राष्ट्रीय छावा संघटना अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रवीण कानवडे, जिल्हा संपर्कप्रमुख दिनकर घुले, तालुकाध्यक्ष जालिंदर राऊत, उपाध्यक्ष मारुती सोनवणे, शहराध्यक्ष दीपक चोरमले, उपाध्यक्ष विलास रसाळ, कार्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, वाहतूक सेना अध्यक्ष विजय पवार, वारकरी आघाडीचे वासुदेव महाराज, जितेंद्र मोकळ, दीपक भागवत, देविदास पवार, सचिन उगले, राजू उदवंत, रवी साबळे, सचिन बालवडे, मोबीन शेख, समाधान साळवे, नाना भालेराव, राजू चरवंडे ,पोपट भारसकाळ आधी सहकार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री महसूल मंत्री जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या विविध कार्यालयांना आणि संगमनेर नगरपालिका परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर यांना संघटनेच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत.

