दिवाळीत एसटीचा संप ?

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

एस टी महामंडळातील अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे समजते. त्या मुळे दिवाळीत पुन्हा एकदा एसटी कर्मचारी संपाचे हत्यार उपसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षी पुकारलेल्या संपाने संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचे हाल झाले. या वेळी तसे होऊ नये म्हणून नवे सरकार काय प्रयत्न करणार या कडे सर्वांचे लक्ष असेल.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व आखडलेल्या पगार करावेत या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे दळणवळणच थांबले होते. गेल्या वर्षी कसातरी हा संप मिटला. मात्र, त्यातल्या अनेक मागण्यात अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. शिवाय एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार १० तारखेनंतरही झाला नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले असल्याचे समजते.

महामंडळाला एसटी सेवेतून आवश्यक ते उत्पन्न मिळत नाही. त्यात गेल्यावर्षी संप पुकारल्याने अनेक गाड्या महिनोनमहिने जागेवरच उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांच्यात यांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीची कामे निघाली. त्यातच प्रवासी संख्या घटली. या साऱ्यांमुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे सरकारच्या निधीवरच मंडळाचा कारभार सुरू आहे. त्यात आता सरकारने या निधीला कात्री लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.

सरकारने उच्च न्यायालयाला दिलेली हमीही पाळली नसल्याचे सांगण्यात येत आहे. औद्योगिक न्यायालयाचेही उल्लंघन केल्याचा आरोप होतोय. चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांचा पीएफ, विमा, घराचे हफ्ते थकले आहेत. यासह इतर मागण्या पुढे करत एसटी कर्मचारी संपाच्या तयारीत असल्याचे समजते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!