“दप्तर घ्या… बकऱ्या द्या !”
ईडी सरकारच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
शिंदे सरकारने राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा धडाका लावला आहे. शिक्षणापासून हजारो विद्यार्थी वंचित राहू लागले आहेत. असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या दरेवाडीत घडला. मात्र येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करीत शिंदे सरकारच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणले आहे.

समायोजनाच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील विस्थापित कुटुंबातील विद्यार्थ्यांची शाळाच एक महिन्यापासून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शिक्षणाचा हक्क परत मिळवण्यासाठी मंगळवारी या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेवर धडक देत “दप्तर घ्या” बकऱ्या द्या” आंदोलन छेडले. इयत्ता पहिली ते पाचवीतील चिमुकल्यांच्या आंदोलनापुढे शिक्षण विभागाने नमते घेत शाळा पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मिंदे सरकारच्या अनागोंदी कारभाराला चांगली चपराक बसली आहे.

भाम धरणासाठी जागा गेल्याने इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी सह इतर गावातील रहिवासी हे गेल्या काही वर्षांपासून विस्थापित झाले आहेत. त्यांना पर्यायी जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. टेकडीवर आणि पायथ्याशी अशा दोन ठिकाणी दरेवाडीतील रहिवासी राहतात.

पायथ्याशी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पत्र्याच्या शेडमध्ये एक शिक्षकी तात्पुरती शाळा सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन नियमांचा आधार घेत ४३ विद्यार्थ्यांची ही शाळा कमी पटसंखेच्या कारणाखाली गटशिक्षण अधिकाऱ्यांनी १३ सप्टेंबर पासून बंद केली.

टेकडीवरील किंवा जवळच्या अन्य शाळेत समायोजित होऊन तेथे शिक्षण घ्यावे असा दबाव गटशिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांवर टाकला. वारंवार विनंती करूनही शाळा सुरूच झाली नाही.
एक महिन्यापासून विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावला गेल्याने सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे हे पुढे सरसावले. त्यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ४३ विद्यार्थी, काहींचे पालक यांनी दप्तर आणि बकऱ्यांसह जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढला. प्रवेशद्वारावर ठिय्या दिला.

“दप्तर घ्या, बकऱ्या द्या” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिक्षण नाही तर किमान बकऱ्या पाळून तरी आम्ही आमचा उदरनिर्वाह करू असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. इयत्ता पहिली ते पाचवीतील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले. दरेवाडीच्या टेकडीच्या पायथ्याजवळची बंद केलेली शाळा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन शिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी न भेटल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शाळा तात्काळ सुरू करावी, विद्यार्थ्यांना महिन्यापासून शिक्षणापासून वंचित ठेवणारे गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाई करावी, नवीन शाळेला तत्काळ मंजुरी द्यावी. या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
(सौजन्य- दैनिक सामना)

