संगमनेर कॅफे शॉप मधून धरपकड केलेल्या २८ युवक युवतींना वॉर्निंग देऊन सोडले !
कॅफे चालकांवर मुंबई पोलीस ऍक्ट प्रमाणे कारवाई होणार
प्रतिनिधी —
कॅफे शॉप वर छापे घालून पकडण्यात आलेल्या युगुलांना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नेल्यावर ‘वॉर्निंग’ देऊन सोडण्यात आले आहे. तर कॅफे शॉप मालकांवर मुंबई पोलीस ऍक्ट नुसार कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आज दुपारी संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील आणि उपनगरातील कॉफी कॅफे शॉप वर एकाच वेळी छापे घातले. यामध्ये तीन ते चार कॅफे शॉप मध्ये मुले मुली कंपार्टमेंट मध्ये बसल्याचे आढळून आले. या कॉफी शॉप मध्ये विविध कंपार्टमेंट करण्यात आली होती.

कॅफे शॉप मध्ये या कंपार्टमेंटच्या प्रेमी युगुलांचे अड्डे चालत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून २८ युवक आणि युवतींना ताब्यात घेतले होते.

या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन त्यांना वॉर्निंग देऊन सोडण्यात आले आहे. मात्र कॅफे चालकांवर मुंबई पोलीस ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

