संगमनेर शहरातील कॅफे शॉप वर पोलिसांचे छापे ! प्रेमी युगुलांची धरपकड !!
प्रतिनिधी —
संगमनेर शहर पोलिसांनी आज शहरातील अनेक कॉफी शॉप, कॅफे शॉप वर अचानक छापे घालून त्या ठिकाणी चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांना पकडून पोलीस ठाण्यात आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू असून पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील कॉफी कॅफे शॉप वर अचानक छापे घातले. शहरातील जवळजवळ सात ते आठ कॅफे शॉप वर छापे घालण्यात आले असून या कॅफेमध्ये कॅफेच्या नावाखाली प्रेमी युगुलांना एकमेकांना भेटण्याचे अड्डे चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
संगमनेरातील कॉफी कॅफे शॉप मध्ये असणाऱ्या कंपार्टमेंट मध्ये शालेय व कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींचे पडद्याआड वामकृत्य चालू असते. हे सर्व बेकायदेशीर असून त्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपेश ताटकर यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
संगमनेर महाविद्यालय लगतचा परिसर, शहर व उपनगरांच्या परिसरात असे कॅफे सुरू झाले असून कॅफेमध्ये असणाऱ्या कंपार्टमेंट मध्ये प्रेमी युगुल मुलांसाठी तयार करून दिले देण्यात आले आहेत. व तेथे पडदे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी शारीरिक व लैंगिक शोषणाचे प्रकार होऊ शकतात. कॉफी कॅफे मधून गांजा, मद्य, हुक्का पार्लरची सुद्धा सुविधा गुपचूप पणे उपलब्ध करून दिली जात असल्याची तक्रार भाजपा युवा मोर्चाच्या निवेदनात करण्यात आलेली आहे.

कॉफी कॅफेच्या नावाखाली शॉप मध्ये मुला मुलींना बसण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करणे बेकायदेशीर आहे. तसे कोणालाही करता येणार नाही. कॉफी कॅफे चालवणाऱ्या मालकांना त्याबाबत कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन दिवसात हे सर्व कंपार्टमेंट्स तोडून टाकले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

पोलिसांच्या अचानक छापेमारीमुळे प्रेमी युगोलांमध्ये एकच खळबळ उडाली असून छाप्यांच्या वेळी मोठी धावपळ झाली. बरीच तरुण जोडपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समजली असून त्यापैकी काहींना पोलीस स्टेशन मध्ये देखील आणले आहे. पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही कारवाई सुरू असताना कॅफे शॉप समोर बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

