कऱ्हे घाटात गोवंश मांस तस्करी करणारी कार पेटली !
महाशिवरात्र असो की नवरात्र असो संगमनेरात गोवंश हत्या सुरूच !
प्रतिनिधी —
रात्रीच्या वेळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हे घाटात बर्निंग कारचा थरार समोर आला खरा पण ती कार गोवंश मांस घेऊन जाणारी मारुती स्विफ्ट कार असल्याने संगमनेर शहरातील गोवंश हत्या पुन्हा एकदा उघडकीस आली असून कत्तलखाने बंद नसल्याचे समोर आले आहे. जळत्या गाडीमधून गोवंश मांसाची दुर्गंधी पसरली होती. या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी पाणी मारून गाडी विझविण्याचा प्रयत्न केला. गाडीतील अज्ञात मांस तस्कर मात्र गायब झाले आहेत.

महाशिवरात्र असो की नवरात्र असो संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यातून होणारी गोवंश हत्या मात्र काही थांबलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात कु-प्रसिद्ध असलेली ही बेकायदेशीर गोहत्या संगमनेरची बदनामी अजून किती दिवस करणार आहे आणि पोलीस प्रशासन त्यावर कायमस्वरूपी कोणती कारवाई करणार आहेत हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पोलीस आणि प्रशासनाचे साफ दुर्लक्ष गोववंश हत्त्येला कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.

काल रात्री (बुधवार) संगमनेर येथून नाशिक कडे जाणाऱ्या सिल्वर रंगाच्या (एम एच ४३ एएफ 9598) नंबरच्या मारुती स्विफ्ट कारला सायखिंडी शिवारात कऱ्हे घाटात अचानक भीषण आग लागली. ही आग लागल्यानंतर आतले अज्ञात वाहनचालक व तस्कर गायब झाले. ही आग कुणीतरी येऊन विझविली देखील. मात्र या गाडीत होते गोवंश कत्तल केलेले मांस.

गोवंश कत्तलीच्या मांसाने संपूर्ण गाडी भरलेली होती. जवळजवळ ५०० ते ६०० किलो मांस या गाडीत असावे असा अंदाज आहे. ही गाडी जळून खाक झाली. हे गोवंश मांस नाशिककडे विक्रीला नेणाऱ्या त्या कारमधील अज्ञात लोक मात्र गायब झाले आहेत.
बजरंग दलाच्या संगमनेर शहरातील कार्यकर्त्यांना ही माहिती समजताच रात्री त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्री अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ते होते. या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले होते. परंतु रात्री अकरा वाजेपर्यंत पोलीस तिकडे आले नव्हते. शेवटी वैतागून हे कार्यकर्ते घरी आले.

रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भाने गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालक आणि गोवंश तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ओंकार रमेश शेंगाळ यांनी फिर्याद दिली आहे. तसेच या ठिकाणी सदर कार मध्ये अर्धवट जळालेले गोवंश मांस असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वेळोवेळी पोलिसांना सांगून ही पोलीस साधी दखलही घेत नसल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे यांना घाटात एक मारुती कार जळत असल्याचे निरोप आले. या गाडीमध्ये गोवंश मांस पूर्णपणे भरलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. तातडीने ते घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली होती आणि गाडी कोणीतरी येऊन विझविण्याचा प्रयत्न देखील केला होता. गाडीवर पाणी मारण्यात आलेले होते.

मात्र ही गाडी कोणी विझविली हे समजू शकले नाही. संबंधित कार्यकर्त्यांनी गाडीचे चोहोबाजूंनी फोटो घेतले. आतील फोटो देखील विदारक होते. संपूर्ण गाडीमध्ये गोवंश मांस भरलेले होते. गाडीने अचानक पेट घेतला असावा आणि या मांसाची वाहतूक व विक्री करणारे तस्कर पळून गेले असावेत असा अंदाज आहे.

कानकाटे आणि ठाकूर यांनी पोलिसांना फोन लावून ही माहिती कळविली. रात्री अकरा वाजेपर्यंत ते घटनास्थळी थांबले. मात्र त्या ठिकाणी तो पर्यंत पोलीस नाहीत असे त्यांनी सांगितले.
यापूर्वीच स्विफ्ट कार मधून नांदुर-शिंगोटे निमोण मार्गावर गोमांस वाहतूक व विक्री साठी जात असताना पोलिसांना सापडून आले. संगमनेर तालुका पोलिसांनी ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. अपघात झाल्यामुळे ही घटना उघड झाली. आता पुन्हा एकदा स्विफ्ट कार जळाल्याने गोमांस तस्करी उघड झाली आहे. आणि तेही तालुका पोलिसांच्या हद्दीत. पोलीस गोवंश हत्याखोरांना आणि तस्करांना पाठीशी घालित असल्याचा स्पष्ट आरोप आता होऊ लागले आहे.

