निरोगी जीवनासाठी आरोग्य संपदा महत्त्वाची — कुंदा महाजन
प्रतिनिधी —
आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपले व्यक्तिगत आरोग्य जपणे गरजेचे असल्याचे मत खेलरंग फिटनेस अँड सायन्स असोसिएशन नाशिकच्या अध्यक्ष कुंदा महाजन यांनी व्यक्त केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील जिमखाना विभाग आणि खेलरंग फिटनेस अँड सायन्स असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने चांगले ‘जीवन जगण्यासाठी निरोगी जीवनशैली’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील हे होते. तर व्यासपीठावर डॉ. कविता खोलगडे, प्रवीण खोलगडे, उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, नॅक समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रमोद खरे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी महाविद्यालयातील जिमखाना विभाग आणि खेलरंग फिटनेस अँड सायन्स असोसिएशन, नाशिक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
कुंदा महाजन म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या जीवनात व्यक्तीला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी शरीरात प्रवेश करत आहेत. आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले नाहीत तर भविष्यात अनेक व्याधींचा सामना करावा लागेल. त्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. कविता खोलगडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनातच चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. त्यामुळे भविष्यात निरोगी आयुष्य जगता येईल. याबरोबरच दैनंदिन जीवन जगताना आहार हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे सकस व नैसर्गिक आहाराला महत्त्व देऊन या आहाराला आपल्या जीवनात प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

प्रवीण खोलगडे म्हणाले की, शारीरिक व्यायामामुळे हृदय गती वाढते आणि शरीरात ऑक्सिजनचा वापर होतो. त्यामुळे व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. यासाठी शारीरिक व्यायामाला महत्व देणे ही तेवढेच गरजेचे आहे.प्राचार्य दिनानाथ पाटील म्हणाले की, जीवनात निरोगी जीवनशैली व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम करते. त्यामुळे प्रत्येकाने आपली आरोग्य संपदा जपली पाहिजे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रमोद खरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. आबासाहेब पोकळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शोभा राहणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. खामकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

