संगमनेर महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी —
संगमनेर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी संगमनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.श्रीहरी पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सदरकार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड हे अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनिल चव्हाण यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ.सचिन कदम यांनी केले.

हिंदी दिना विषयी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. श्रीहरी पिंगळे म्हणाले की, हिंदी भाषा ही देशाला एकात्मतेच्या धाग्याने बांधणारी समृद्ध भाषा आहे. हिंदी भाषा ही केवळ भाषा नसून ती श्रद्धेची बाब आहे. हिंदी भाषा ही भारत राष्ट्रात आत्मीयतेची भावना देणारी भाषा आहे. आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी भाषेच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, आज देशात हिंदी ही एकमेव वैज्ञानिक भाषा म्हणून विकसित झालेली भाषा आहे. हिंदी भाषेचे साहित्य खूप समृद्ध आहे आणि तो भारतीय संस्कृतीचा वारसा आहे.

प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड आपल्या अध्यक्षीय संबोधनामध्ये म्हणाले की, हिंदी भाषा ही भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. हिंदी भाषा हा आपला अभिमान, स्वाभिमान आणि भारताच्या अखंडतेचा पुरावा आहे. केवळ एका दिवसासाठी हिंदी भाषा दिन साजरा न करता विद्यार्थ्यांनी नेहमी हिंदी भाषेत सक्षमपणे आणि सतत व्यक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हिंदी भाषेचा केवळ भारत देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर विकास होत आहे. आज सर्व विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेसी संबंधित सर्व गतिविधिंशी जोडले जाणे आवश्यक आहे असे म्हणत त्यांनी हिंदी विभागाच्या परंपरेवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील व आभार प्रकटन डॉ. शरद शिरोळे यांनी केले. हिंदी दिनाचा हा कार्यक्रम तीन दिवसाचा घेण्यात आला, त्यात विशेष व्याख्यान, निबंध लेखन स्पर्धा, साहित्य आधारित लघु फिल्म-प्रदर्शन, काव्य प्रस्तुतीकरण इ. उपक्रम घेण्यात आले. या प्रसंगीमहाविद्यालयातील १२५ विध्यार्थी व प्राध्यापकांनी कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. हिंदी दिनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

