भविष्यात महाविद्यालयांचे मूल्यांकन हे संख्येवर नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार — डॉ. भूषण पटवर्धन
संगमनेर दि. (सा.वा.)
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी (NEP 2020) करत असताना, निश्चितच आनंद होत आहे. देशातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय यांचे मूल्यांकन करणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या मूल्यांकन प्रक्रियेत मूलभूत बदल होणार असून, भावी काळात मूल्यांकन हे संख्येवर नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. असे मत बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सुधार योजना सेलच्या विद्यमाने ‘ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व नॅक मूल्यांकनांची पुनर्बांधणी ‘ या विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर बीज भाषणात बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी होते. तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. संजीव सोनवणे (प्र. कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे), महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. अरुण गायकवाड, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. भालचंद्र भावे, डॉ. राजेंद्र लढ्ढा, डॉ. रवींद्र ताशिलदार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सचिव डॉ.दिगंबर घोडके आदी उपस्थित होते.

डॉ.पटवर्धन म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारे नॅक सुधारित अभ्यासक्रमाची पायाबांधनी कशी करावी व नॅक मूल्यांकनात येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी यावर विस्ताराने चिंतन करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार उत्तम विद्यार्थी घडविण्याची ही योग्य वेळ आहे.

शिक्षणाला तांत्रिक बंधनातून मुक्त करण्याची गरज आहे. व्यक्तीचा सर्वाधिक विकास करणारे शिक्षण आज आवश्यक आहे. शिक्षणाशी निगडित असणाऱ्या प्रत्येक घटकाने, शिक्षण प्रक्रिया सुदृढ केली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. संजय मालपाणी म्हणाले, नॅकच्या अध्यक्षांची निवड ही खरोखरच योग्य व्यक्तीची निवड आहे.नवीन शिक्षण पद्धतीत बदल करताना खूप अडचणी येतात. परंतु संगमनेर महाविद्यालय सर्व अडचणीवर मात करून पुढे जाण्यास सज्ज आहे.जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम निर्माण करणार आहोत.

भारतामध्ये असणारी पूर्वीची आदर्श शिक्षणाची परंपरा आपणास पुन्हा निर्माण करायची आहे. तसेच शिक्षणामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात त्यामुळे शिक्षणाला खूप महत्त्व आहे. महाविद्यालयीन पातळीवर नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य तत्पर आहेत. विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळाले पाहिजे.असेही ते यावेळी म्हणाले.

डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, येणाऱ्या भावी काळात नवीन शैक्षणिक धोरणानुसार मूल्यांकन आवश्यक आहे. ज्ञानयुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती सर्वांनी करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्तेबरोबर, शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता तपासून पाहिली पाहिजे. काळानुरूप नव्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल आवश्यक आहेत.

अध्यापकाने शिक्षणाच्या मूलभूत बाबी समजून कार्य करण्याची गरज आहे. यादृष्टीने गुरुकुल पद्धतीचे शिक्षण आपल्या संस्कृतीत पूर्वी होते. त्यामुळे आपल्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्याला करून देता आली पाहिजे असेही यावेळी डॉ. सोनवणे म्हणाले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना डॉ. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, शिक्षणात मूलभूत गोष्टींचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणाने सर्वांना संधीची उपलब्धता होणार आहे.सर्वार्थाने समाजाच्या सर्व घटकांना उन्नत करणारे, समाजाच्या सुखदुःखाची समरस होणारा विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ डिग्रीपुरते मर्यादित शिक्षण न घेता स्थानिक वातावरणाचा अभ्याससुद्धा करावा. निश्चितच नवीन एज्युकेशन पॉलिसी आपल्यासाठी एक वरदान ठरणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रातील दुसरे वक्ते डॉ.के.पी. मोहनन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरण नॅक मूल्यांकन याच्या संदर्भात विस्ताराने मांडणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. उमेश जगदाळे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. दिगंबर घोडके यांनी केला. तर आभार डॉ. श्रीनिवास भोंग व्यक्त केले.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारे नॅक चे सुधारीत मूल्यांकन व पायाबांधणी करत असताना येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी यावर विस्ताराने मार्गदर्शन करण्यात आले. या एकदिवसीय कार्यशाळेसाठी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्राचार्य, महाविद्यालयीन गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवून; प्रश्नोत्तरे विचारून, नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून घेतली. सदर कार्यक्रम संगमनेर बीएड महाविद्यालयाच्या छटाकाबाई बाफना सभागृहात संपन्न झाला.

