शरीरा बरोबरच मनाच्या स्वच्छतेचीही गरज ! – प्रा. सातपुते
प्रतिनिधी —
कोणत्याही देशाचा विकास स्त्री पुरुष समानतेवरच अवलंबून असतो. आपला समाज प्रगत करायचा असेल तर शारीरिक स्वच्छतेबरोबर मानसिक स्वच्छता असणे गरजेचे असते असे प्रतिपादन प्रा. दीप्ती सातपुते यांनी केले.

मुलींची शारीरिक स्वच्छता व समुपदेशन कार्यशाळेच्या कार्यक्रमांतर्गत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्ञानमाता संकुलाचे मॅनेजर फादर आबा वाघमारे, प्राचार्य फादर जेम्स थोरात, पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड, प्रा. शारदा नवले, प्रा. पल्लवी कुलकर्णी, प्रा.तिलोत्तमा शेळके आदी उपस्थित होते.

प्रा.सातपुते पुढे म्हणाल्या, बदलत्या जीवनशैलीचा मुलींच्या शारीरिक स्थितीवर मोठा परिणाम होतो आहे. तो वेळीच लक्षात घेतला पाहिजे. त्या दृष्टीने विचार केला असता किशोर वयात शरीरामध्ये होणाऱ्या बदलांबद्दल योग्य ते मार्गदर्शन मुलींना मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे पालकांनी त्यांच्याशी सुसंवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल, प्लास्टिक, सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर कमी करून शारीरिक स्वच्छता, नियमित व्यायाम, योग्य आहार, तणावरहित जगणे, इतरांप्रती आदर भाव बाळगल्यास येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्य आहे.

निसर्गाने पृथ्वीवरील सर्वात सुंदर व मौल्यवान गोष्ट म्हणून स्त्रीला जन्माला घातले आहे. परंतु, सध्या मात्र ही सुंदरता टिकवणे काळाची गरज झाली असून आपण सर्वांनीच त्याच्यामध्ये सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विता कडलग यांनी केले तर आभार प्रा. तिलोत्तमा शेळके यांनी मानले.

