शिक्षकांविषयी आमदार बंब यांची भूमिका अयोग्य – आमदार डॉ.सुधीर तांबे
प्रतिनिधी —
शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत व तरी देखील घरभाडे व भत्ता घेतात हा आरोप चुकीचा आहे. आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांविषयी ( विशेषतः जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांविषयी ) मांडलेले मत हे अत्यंत चुकीचे व निषेधार्थ असल्याचे मत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहे.

खरं तर सध्या शासनाचे शिक्षकांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांचा कार्यभार खूपच वाढला आहे. अनेक शैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. शालेय पोषण आहार, सततच्या निवडणुकांची कामे, अनेक सर्वेक्षणे ही सर्व कामे पार पाडीत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करावे लागते. मुख्यालयाला राहण्याचा आग्रह देखील चुकीचा आहे. सध्या वाहतुकीच्या सुविधा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे मुख्यालयातच रहावे हा दुराग्रह अनावश्यक आहे. अनेक शिक्षकांनी स्वखर्चाने इमारती रंगविल्या, सजविल्या आहेत. स्वतःच्या खिशातून खर्च करून विज बिल भरणे, पोषण आहारासाठी खर्च करणे अशी अनेक योगदान शिक्षक देत असता.

हल्ली जिल्हा परिषदेच्या शाळा खूपच चांगल्या झालेल्या आहेत. त्यांची गुणवत्ता देखील खूप वाढलेली आहे. हे सर्व शिक्षकांच्या योगदानामुळे घडत आहे. आज मोठ्या प्रमाणावर शिक्षक विनाअनुदानित शाळांवर काम करीत आहेत. त्यांना वेठ बिगारी प्रमाणावर राबविले जात आहे. विनावेतन शिक्षक उपाशीपोटी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. अनेक ठिकाणी बसायला वर्ग खोल्या नाहीत. आमदार प्रशांत बंब या सर्व अडचणी न मांडता त्या ऐवजी अनाठाई टीका करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील समस्यांना समजावून घेणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे आमदार बंब यांचे वक्तव्य अत्यंत अयोग्य आहे असेही आमदार डॉ.तांबे म्हणाले.

