पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून शाळेसाठी जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास !
संगमनेर तालुक्यातील प्रकार

प्रतिनिधी —
मुळा नदीच्या पुराच्या पाण्यात अक्षरश: जीव डोक्यात घालून अनेक शाळकरी मुलांना शाळेसाठी प्रवास करावा लागत असून हा धोकादायक प्रकार मुलांसाठी घातक ठरणारा असल्याने यावर लवकर उपाय शोधला जावा अशी मागणी पालक आणि शाळेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक या गावातील शाळेमध्ये कोठे खुर्द येथून लहान मुले शिकण्यासाठी येत असतात. या दोन्ही गावाच्या मधून मुळा नदी वाहते. सध्या मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असल्याने नदीला पूर आलेला आहे.
कोठे खुर्द आणि कोठे बुद्रुक या गावांना जोडणारा कोल्हापूर टाईप केटीवेअरचा बंधारा पूल शाळकरी मुलांना येण्या जाण्यासाठी वापरावा लागतो. त्याची उंची कमी असल्याने सध्या या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या शाळकरी मुलांना अक्षरश: जीव मुठीत धरून शाळेत जावे लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असून हा पूल म्हणजे एक केटीवरचा पूल आहे. त्यामुळे हे अत्यंत धोक्याचे झाले असून यासाठी उपाय शोधावा लागणार आहे. शाळकरी मुलांबरोबरच माध्यमिक मुलांचा देखील हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यामध्ये दरवर्षी हा प्रश्न उद्भवतो. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यानंतर या केटीवेअरच्या आधी असणारे तलाव व केटीवेअर भरल्यानंतर या केटीवेअर वरील पाण्याची पातळी वाढत जाते. त्यामुळे रस्ता पूर्ण बंद होतो. मुलांना शाळेत मुक्कामी ठेवून घेता येत नाही. मुलींचा प्रश्न असतो. त्यामुळे शासनाने या केटीवेअरची उंची वाढवली तरी येथून ये जा करणे सोपे होईल. हे महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे. असे येथील अमृतेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी दत्तात्रय सोंडेकर यादी सांगितले.

