चेक बाउन्स प्रकरणी लेखा परीक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास !

प्रतिनिधी —

शेअर मार्केट मधील व्यवहारात तोटा आल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या लेखापरीक्षकाने दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी लेखा परीक्षक असलेल्या आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय फिर्यादीस १६ लाख १२ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.

संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील सविता कानवडे यांनी आपल्या ओळखीच्या असलेल्या मुंबई येथील राजेश मुलजीभाई रूपारेल या लेखापरीक्षकाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. संबंधित महिलेचे ट्रेडिंग अकाउंट आरोपी राजेश रूपारेल यांनी हाताळले होते. शेअर मार्केटच्या या व्यवहारात कानवडे यांना तोटा सोसावा लागला. त्यामुळे रूपारेल यांनी कायदेशीर रक्कम देण्याची जबाबदारी स्वीकारत फिर्यादी महिलेस आयसीआयसीआय या बँकेचा मुलुंड शाखेचा १२ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश दिला होता.

कानवडे यांनी हा धनादेश त्यांच्या खात्यामध्ये भरला असता आरोपी राजेश रूपारेल यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो परत आला होता. त्यामुळे कानवडे यांनी आरोपी विरोधात चलनक्षम कायदा कलम १३८ अन्वये संगमनेरच्या न्यायालयात २०१७ मध्ये तक्रार केली होती. संगमनेर न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादर यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू होती.

फिर्यादी कानवडे यांच्या वतीने संगमनेरमधील वकील गिरीश मेंद्रे यांनी न्यायालयासमोर फिर्यादीची बाजू मांडली. त्यांना वकील एम. एस. जोर्वेकर यांनी सहकार्य केले. न्यायाधीश एस. यु. महादर यांनी फिर्यादी आणि आरोपी यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समोर आलेल्या पुराव्याअंती लेखापरीक्षक असलेल्या आरोपी राजेश रूपारेल यांना दोषी ठरवत एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. शिवाय फिर्यादी महिलेस न वठलेल्या धनादेशाचे नुकसान भरपाई म्हणून १६ लाख १२ हजार ५०० रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!