कट रचून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; पाच आरोपींना अटक
पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने दीड दिवसात लावला मुलीचा शोध
प्रतिनिधी —
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पंधरा दिवस गावोगावी फिरवून डांबून ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाच आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन ही कारवाई केली आहे.

अमोल बापू खेमनर, सिंधुबाई बापू खेमनर, बापू रंभा खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे, पोपट शेरमाळे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

घरकाम व शेती करणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली असून शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला अमोल बापू खेमनर याने पंधरा दिवसांपूर्वी अपहरण करून पळवून नेले होते. व पुन्हा आणून सोडले होते त्यावेळी अमोल खेमनर यास तंबी देण्यात आली होती.

त्यानंतर अमोल खेमनर याच्या सोबत असणाऱ्या वरील सहा जणांनी कट रचून त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या ब्रीझा गाडी मधून येऊन संबंधितांवर दबाव टाकून दमबाजी केली व मारहाण केली. तसेच अल्पवयीन मुलीचे आजोबा आणि आजी यांना देखील मारहाण करून ‘आमच्या नादाला लागल तर, एकेकाला संपवून टाकू अशी धमकी दिली. आणि सदर मुलीला धमकी देत दमबाजी करीत पळवून नेले होते.

सदर आरोपीने पीडित मुलीस श्रीगोंदा, दौंड, पाटस, बारामती, भिगवन येथे नेले, फिरवले असल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाल्याने पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने त्या ठिकाणी तपास करून शोध केला.

तपास पथकाने तात्काळ जाऊन दिड दिवसांमध्ये अल्पवयीन मुलगी व आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मारुती सुझुकी ब्रिझा कार नंबर एम एच १४ एफ एस ६५८९ व एक हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी ती घारगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे.

घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह या संपूर्ण तपासात पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई अमृत आढाव, पोलीस शिपाई सुभाष घोडके, पोलीस शिपाई प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस शिपाई प्रमोद जाधव, पोलीस शिपाई आकाश बहिरट, पोलीस नाईक संतोष खैरे, पोलीस नाईक गणेश लोंढे, पोलीस शिपाई हरिश्चंद्र बांडे, पोलीस शिपाई प्रमोद चव्हाण यांनी सहभाग घेत कारवाई केली.

