मुले पळविणारी कुठल्याही प्रकारची टोळी अहमदनगर मध्ये सक्रिय नाही — पोलीस अधीक्षक
प्रतिनिधी —
अहमदनगर जिल्ह्यामध्ये लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा आणि जुने काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये तोडफोड करून सोशल मीडियातून संदेश पसरवून जनते मध्ये जाणीवपूर्व संभ्रम करण्याचे प्रकार चालू आहेत.

त्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि शहरात मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भात नगर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करून असा कुठलाही प्रकार होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जनतेला आव्हान करताना पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे की, याबाबत पोलीस सतर्क असून कोणतीही परिस्थिती हाताळण्याची तयारी करण्यात आलेली आहे. अशा कुठल्याही प्रकारची टोळी सक्रिय झालेली नाही. जर आपल्या परिसरामध्ये कोणी संशयित मिळून आल्यास त्यास कुठल्याही प्रकारची मारहाण न करता पोलिसांशी संपर्क साधावा किंवा त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे.

अशा एखाद्या व्यक्तीस मारहाण झाली तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. विनाकारण निष्पाप माणसांना देखील यातून मारहाण होऊ शकते. शिवाय अशा प्रकारचे कुठलेही प्रसारित होणारे संदेश आपण सोशल मीडियावरून फॉरवर्ड करू नयेत अगर व्हायरल करू नयेत. असे संदेश जाणीवपूर्वक व्हायरल केल्यास आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

वरील कारणामुळे कोणीही घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षात संपर्क साधावा व आपल्या जिल्ह्याची शांतता, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत करावी.
या बाबतीत पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्ष अहमदनगर यांचा दूरध्वनी क्रमांक ०२४१ / २४१६१३२ आणि हेल्पलाइन डायल ११२ हे नंबर नागरिकांसाठी प्रसिद्ध केले आहेत.

