अरे त्या धरणाचा ‘धनी’ कोण ?
इडीचा मालक सुभेदारांचा धनी !
विशेष प्रतिनिधी —
सध्या आटपाट नगरात एका धरणावरून जोरदार जुगलबंदी सुरू झालेली आहे. आटपाट नगरीच्या धरणाचा धनी कोण ? यावरून आटपाट नगरीच्या वेगवेगळ्या सुभेदारांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे.

या सुभेदारांचे म्हणणे असे आहे की, आटपाट नगरी साठी उभे केलेले हे जे धरण आहे या धरणाचे धनी, मालक, निर्माते, जनक, जन्मदाते आम्हीच आहोत. हे धरण निर्माण करताना मिळालेला पैसा, लागलेला पैसा, ठेकेदारी या सर्व गोष्टींचे सुद्धा जनक आणि धनी आम्हीच आहोत.

वेगवेगळ्या सुभेदारांचे वेगवेगळे दावे – प्रतिदावे होऊ लागले. त्यामुळे या धरणाचा मूळ मालक कोण ? धरणाचे नेमके धनी कोण ? हा चर्चेचा विषय आता आटपाट नगरीत रयतेच्या तोंडी दिसू लागला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेले हे धरण आता प्रवाही झाले आहे. धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालव्यांची कामे सुरू आहेत. शेतकरी, रयतेच्या जीवावर राजकारण करत करत आजूबाजूच्या सर्व सुभेदारांनी धरणाचा आपल्या राजकीय खुर्ची साठी जसा पाहिजे तसा उपयोग करून घेतलेला आहे.

राजकारणासाठी धरणाचा वापर, पाण्याचा वापर या सुभेदारांनी जोरदारपणे केल्याने त्यांच्या खुर्च्या अनेक वेळा वाचल्या आहेत. आटपाट नगरीच्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी या धरणाच्या दुकानदारीने आणि भाषणबाजी मध्ये सर्व सुभेदारांनी आपापले रंग दाखवत निवडणुका जिंकल्या आहेत.

पूर्वेकडचे सुभेदार, पश्चिमेकडे सुभेदार आणि मधले सुभेदार या सुभेदारांमध्ये नेहमीच जोरदार चढाओढ लागलेली असते. आम्हीच आहोत धरणाचे जनक, आम्हीच आहोत धरणाचे चे धनी ! असा नारा देत हे सुभेदार वारंवार रयतेला विविध कहाण्या सुनवत असतात.

धरण पूर्ण करण्यासाठी कुणी कसा त्याग केला आहे, कोणी कशी माती खाल्ली आहे, कोणी कसा मुरूम खाल्ला आहे, कुणी कशी वाळू उपसली आहे, कुणी कसे लोखंड विकले आहे, कोणी कसे भंगार विकले आहे, कुणी कसे सिमेंट पळवले आहे, कुणी कसे दगड, माती खान पळवले आहेत, कुणी कशा ठेकेदाऱ्या मिळवल्या आहेत याबाबत धन्यांमध्ये आणि सुभेदारांमध्ये मात्र एकोपा झालेला दिसून येत असून वरील सर्व बाबीत सर्वांचेच मौन आहे.
रयतेच्या पैशावर उभे राहिलेले हे धरण आणि त्याची मालकी मात्र सुभेदार, श्रीमंत धन्यांनी मिळवण्यासाठी चालवलेली जुगलबंदी ही गंमतशीर ठरत आहे.

सुभेदारांच्या विविध सुभेदारऱ्यां मध्ये असलेले प्रश्न, विविध मूलभूत समस्या, ओला दुष्काळ, बेरोजगारी, रेशनकार्डचे घोटाळे, कारखान्यांमधले घोटाळे, कर्जबाजारी, डबघाईला आलेले कारखाने यावर मात्र काही सुभेदार सोयीस्कररित्या गप्प बसलेले आहेत. आपणच आपल्या सुभेदारीत आपापल्या मतदारसंघात अशी घाण केली आहे त्याचे धनी कोण ? हे मात्र सांगितले जात नाही.

इडी नावाच्या राक्षसाच्या भीतीमुळे काही सुभेदार आपल्या सुभेदाऱ्या वाचवण्यासाठी मूळ धनी सोडून इडीच्या मालक, धन्याकडे आपली सुभेदारी गहाण टाकून राजकीय दुकानदारी करत असल्याचे सुद्धा आटपाट नगरीची रयत ‘याची देही याची डोळा’ पाहत आहे.

सुभेदारी करीत असताना मिळवलेली संपत्ती, गुप्त ठिकाणी असलेले खजिने, गुप्त असलेल्या सोयरीकी, अंगवस्रे सांभाळण्यात काही सुभेदार मग्न होते. ईडीचे भूत मानगुटावर बसू नये म्हणून आणि आपापले खजिने, सोयरीकी राखल्या जाव्यात, शाबूत राहाव्यात म्हणून इडीच्या धन्याकडे लाचार होऊन पडलेली ही मंडळी रयतेच्या मालकीच्या धरणाचे धनी मात्र होऊ इच्छित आहेत.

सुभेदारीतली सत्ता गेल्यावर होणारी आदळ आपट रयत पाहत आहे. आटपाट नगरीच्या राज्यातील सत्ता गेल्यावर पण होत असलेली घालमेल आणि आदळ आपट रयत पाहत होती. आपल्यालाच सुभेदारी मिळत राहो, आटपाट नगरीच्या राज्यातील सत्ता आपल्याच हाती राहो, आपणच सगळ्यांचे धनी, मालक आहोत. रयत आपली गुलाम राहो. अशीच इच्छा या सुभेदारांची त्यांच्या वागणुकीतून दिसून येत आहे.
(लेखासाठी वापरलेले धरणाचे छायाचित्र सिम्बॉलिक आहे.)
