संगमनेर साखर कारखान्याच्या चेअरमन समोरच माजी जिल्हा परिषद सदस्याला मारहाण !

प्रतिनिधी —

 

 

जून्या वादातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांना आज दोन महिलांसह चौघांनी मारहाण केली. संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्यासमोरच ही घटना घडली. घुलेवाडी शिवारात राऊत यांची कार अडवून दोघा महिलांनी त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तर इतर दोघांनी त्यांना प्रोत्साहन देत या संपूर्ण प्रकरणाचे मोबाईलवर चित्रीकरण करुन ते सोशल मीडियात व्हायरल केले. याप्रकरणी राऊत यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांत कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग यांच्यासह भारत संभाजी भोसले या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित महिला व राऊत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा वाद असून त्यांच्यात यावरुन नेहमीच वादावादी होत असते. आज सकाळीही असाच प्रकार घडला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले सीताराम राऊत हे नेहमीप्रमाणे घुलेवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेवून आपल्या वाहनातून जात असताना दोघा महिलांनी त्यांच्या वाहनाला आपले वाहन आडवे उभे केले. यावेळी विद्या अभंग व कविता अभंग यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

राऊत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिला संतप्त झाल्याने त्यांनी राऊत यांना वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडले. ते वाहनाच्या बाहेर येताच कविता संतोष अभंग यांनी त्याच्या शर्टची कॉलर पकडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विद्या संतोष अभंग यांनी त्यांना मारहाणही केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चेन ही त्यांनी ओढून घेतली.

हा संपूर्ण प्रकार सुरु असताना भारत संभाजी भोसले याच्यासह विद्या अभंग यांचा मुलगा प्रथमेश याने आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण चित्रीकरण करुन ते भोसले यांनी समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. हा प्रकार घडत असताना संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्यासमोरच ही घटना घडली.

या घटनेनंतर सीताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे याप्रकरणी शहर पोलिसांत कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग यांच्यासह भारत संभाजी भोसले या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!