पाच लाख रुपयांसाठी सुनेचा छळ करून केला गर्भपात ; तिचा मृतदेह आढळला विहिरीत !
पती व सासूला अटक..
प्रतिनिधी —
सून तिच्या माहेरावरून घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये आणत नाही म्हणून तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. दोन दिवसांपूर्वी विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यामुळे तिचा पती आणि सासू या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही घटना अकोले तालुक्यातील टाहाकारी या गावात घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

मयूर हौशीराम एखंडे (पती), मंगल हौशीराम एखंडे (सासू) दोघे राहणार टाहाकारी, तालुका अकोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सोनाली मयूर एखंडे (वय वर्षे २५) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

अकोले तालुक्यातील विजय एकनाथ आंबरे (रा. गणोरे, ता. अकोले) यांची मुलगी सोनाली हिचा विवाह टाहाकारी येथील मयूर एखंडे याच्याबरोबर साधारण चार महिन्यांपूर्वी झाला होता. लग्न झाल्यानंतर सोनालीने तिच्या माहेरून संगमनेर येथे घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये आणावेत अशी मागणी तिचा पती मयूर आणि सासू मंगल हे वारंवार करीत असत.

या पैशाच्या मागणीमुळे तिला ते वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत असत. सोनालीच्या वडिलांनी पती आणि सासूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्यात कोणताही फरक पडला नाही. सुनबाई माहेराहून पैसे आणत नाही म्हणून चिडलेल्या पती आणि सासूने गर्भवती असलेल्या सोनालीला कुठल्यातरी गोळ्या देऊन तिचा गर्भपात देखील केला.

या सर्व छळाला कंटाळून सोनाली हिने टाहाकारी गावाच्या शिवारातील शांताराम खंडू एखंडे यांच्या विहिरीत जीव दिला असल्याची प्राथमिक माहिती असून मुलीचे वडील विजय एकनाथ आंबरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती मयूर हौशीराम एखंडे आणि सासू मंगल हौशीराम एखंडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करत आहेत.

