खेळामधूनही करिअरच्या अनेक संधी – आमदार थोरात
अमृतवाहिनीतील राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत पुरुष गटात पुणे प्रथम तर महिला गटात भंडारा प्रथम
प्रतिनिधी —
सुदृढ व निरोगी शरीर आणि निकोप मन यासाठी व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे. मैदानी खेळामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहत असून खेळांमधून करिअरच्या अनेक संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत पुरुष गटात पुणे संघाने प्रथम क्रमांक तर महिला गटात भंडारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन, जिल्हा असोसिएशन व अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मेधा मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्य स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा डॉ. ललित जीवनी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांंबे, पंचप्रमुख शाम देशमुख, ॲड. सुहास आहेर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्या तरुणांमध्ये सोशल मीडिया व मोबाईलची जास्त क्रेज आहे. परंतु मोबाईल पेक्षा मैदानाकडे वळले पाहिजे. मैदानी खेळांमुळे आरोग्य हे चांगले राहत असून मनही निकोप राहते. खेळामधूनही अनेक करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम कामगिरी केली तर यश तुम्हाला नक्की मिळते. जय पराजय पचवण्याची क्षमता खेळच माणसाला देत असतात. म्हणून प्रत्येकाने एक तरी खेळाची आवड जोपासली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन थोरात यांनी केले.

या स्पर्धेत पुरुष गटात पुणे संघाने प्रथम, गोंदिया संघाने द्वितीय, औरंगाबाद व अहमदनगर संघाने संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला तर महिला गटामध्ये भंडारा संघ प्रथम, चंद्रपूर द्वितीय, तर तृतीय क्रमांक नाशिक व अकोला संघाने संयुक्तपणे पटकावला. यावेळी श्याम देशमुख, ज्ञानेश्वर वाकचौरे, गौरव डोंगरे, प्रा. इंगळे, मनीष महाजन, हैदर अली सय्यद, राजेंद्र थोरात, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर थोरात, प्रथमेश ढेरंगे, स्वप्नील अभंग, भागवत उगले, सुनील मंडलिक, श्रीधर घोडेकर, योगेश उगले, संघटनेचे विविध खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते.

